मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग बनतोय बनिंग हायवे | पुढारी

मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग बनतोय बनिंग हायवे

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : मुंबई-पुणे एक्स्प्रेस महामार्गावर 17 महिन्यांत 35 वाहनांना आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. यातील बहुतांश घटना आठवड्याच्या शेवटी (वीकेंड) आणि उन्हाळ्यात नोंदवल्या गेल्या आहेत. आगीच्या भक्ष्यस्थानी पडणार्‍या वाहनांमध्ये कार सर्वाधिक आहेत.

जानेवारी 2022 ते मे 2023 या कालावधीत एक्स्प्रेस हायवेवर 35 गाड्यांना आग लागली. त्यात 16 कार आहेत. प्रत्येकी सहा ट्रक आणि टेम्पो आहेत. दोन कंटेनरसह एक बस आणि एक टँकरही आगीचे लक्ष्य ठरला. वाहनांना आग लागण्याचे सर्वाधिक प्रमाण घाट क्षेत्र आहे. 35 पैकी 22 वाहनांना घाटमाथा परिसरात आग लागली आहे. घाटामध्ये, विशेषत: जड वाहतुकीच्या वेळी अ‍ॅक्सिलेटरचा वारंवार वापर केल्याने गरम होते आणि शॉर्टसर्किट होते, असे महामार्ग पोलिसांचे म्हणणे आहे. वीकेंडला वाहनांना आग लागण्याच्या घटना सर्वाधिक आहेत. 35 पैकी 9 आगी शुक्रवारी लागल्यात. शनिवार आणि रविवारच्या अपघातांची संख्या अनुक्रमे 7 आणि 5 इतकी आहे.
उन्हाळ्यामध्ये वाहनांना आग लागण्याचे प्रमाण मोठे असते. 1 मार्च ते 31 मे 2022 या कालावधीत सहा वाहनांना आग लागण्याचे प्रकार घडले. यंदा 1 मार्च ते 22 मे कालावधीत 9 वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत.

Back to top button