शिवराज्याभिषेक सोहळ्याचे टपाल तिकीट अन् लिफाफे काढणार | पुढारी

शिवराज्याभिषेक सोहळ्याचे टपाल तिकीट अन् लिफाफे काढणार

मुंबई : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून राज्याच्या सांस्कृतिक विभागामार्फत शिवराज्याभिषेक सोहळ्यावर आधारित टपाल तिकीट आणि लिफाफे काढण्यात येणार आहेत. त्यांचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

राज्य शासनामार्फत ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला म्हणजेच 6 जून 2023 रोजी रायगडावर 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जाणार आहे. रायगडावर होणार्‍या ऐतिहासिक सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी केवळ राज्यभरातूनच नव्हे; तर देशभरातून शिवभक्त येणार आहेत. सोहळ्यानिमित्त राज्यात वर्षभर विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, हा सोहळा संस्मरणीय व्हावा, यासाठी सांस्कृतिक विभागाने शिवराज्याभिषेक सोहळ्याचे टपाल तिकीट आणि लिफाफे काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी भारतीय टपाल विभागाकडे मंजुरीसाठी पत्रव्यवहार केला आहे. टपाल तिकिटे आणि लिफाफ्यांसाठी होणार्‍या खर्चासाठी सांस्कृतिक विभागाने 12 लाख रुपये मंजूरही केले आहेत.

शिवराज्याभिषेक सोहळ्याचे टपाल तिकीट आणि लिफाफ्यांचे अनावरण करण्यासाठी सांस्कृतिक विभागाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे वेळ मागितला आहे. मोदींच्या हस्तेच तिकीट आणि लिफाफ्यांचे अनावरण करण्याचा सांस्कृतिक विभागाचा मानस आहे. त्यासाठी पंतप्रधानांनी वेळ द्यावा, यासाठी पंतप्रधान कार्यालयात पाठपुरावा सुरू आहे.

Back to top button