मुंबई विद्यापीठात एल.एल.बी.च्या उत्तरपत्रिकाच गहाळ; संतापाची लाट | पुढारी

मुंबई विद्यापीठात एल.एल.बी.च्या उत्तरपत्रिकाच गहाळ; संतापाची लाट

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : एलएलबी अभ्यासक्रमाच्या 5 व्या सेमिस्टरच्या उत्तरपत्रिका मुंबई विद्यापीठाकडून गहाळ झाल्याने या विद्यार्थ्यांना आता एटीकेटी घेत पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे. विद्यापीठाच्या या गलथान कारभारामुळे विद्यार्थ्यांत संतापाची लाट उसळली आहे. गंभीर प्रकार असा की, या प्रकरणात विद्यापीठ लागोपाठ खोटे बोलत गेले आणि उघडे पडले.

महिनोमहिने उशिरा निकाल, परीक्षा पुढे ढकलने, प्रश्नपत्रिकांची अदलाबदल, केंद्रांचे स्थलांतर असे प्रकार होत असताना आता विद्यार्थ्यांनी लिहलेल्या चक्क उत्तरपत्रिकांच गहाळ केल्या आहेत. महाविद्यालय विद्यापीठांच्या चुकांमुळे या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार की काय असा प्रश्न समोर आला आहे.

विद्यार्थी परीक्षेला हजरच नव्हते, असे पहिले खोटे विद्यापीठाने लादले. एलएलबी पाचव्या सेमिस्टर च्या परीक्षा डिसेंबर महिन्यात झाल्या. काहींचा निकाल मार्च अखेरीस तर काही विद्यार्थ्यांचा निकाल एप्रिल महिन्यात जाहीर झाला आणि पहिला धक्का बसला. अनेक विद्यार्थी परीक्षेला गैरहजर असल्याचे विद्यापीठाने दाखवले. या उत्तर पत्रिका प्रत्यक्षात कागदावर लिहिलेल्या आहेत. बारकोड चुकीचा लिहिला तर उत्तरपत्रिका दाखवा, असे आव्हान देताच शब्दांचा खेळ करत उत्तर पत्रिका गहाळ झाल्याचेच विद्यापीठाने मान्य केले.

संत गाडगेबाबा विद्यापीठाचा एल.एल.बी.चा पेपर फुटला

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या एल.एल.बी. अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रावर फुटली. परीक्षेआधी प्रश्नपत्रिका समाज माध्यमावर प्रसारित करण्यात आल्याने या प्रकरणात गाडगेनगर पोलिसांनी भाजपचे माजी नगरसेवक प्रणीत सोनी यांच्यासह तीनजणांना ताब्यात घेतले आहे. येथील शासकीय विदर्भ ज्ञान-विज्ञान संस्थेच्या परीक्षा केंद्रावर शनिवारी विधी अभ्यासक्रमाच्या चौथ्या सेमिस्टरच्या ‘लॉ ट्रस्ट’ या विषयाची परीक्षा होती.

Back to top button