समीर वानखेडे यांचे शाहरूख खान सोबतचे चॅट आले समोर | पुढारी

समीर वानखेडे यांचे शाहरूख खान सोबतचे चॅट आले समोर

मुंबई, वृत्तसंस्था : सीबीआयने केलेल्या कारवाईविरोधात उच्च न्यायालयात गेलेले एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांनी याचिकेसोबत अभिनेता शाहरूख खानसोबत झालेला चॅट सादर केला असून त्यात, शाहरूख त्यांना ‘कृपा करा, आर्यनला मदत करा,’ अशी विनवणी करत आहे. तसेच या संवादात शाहरूखने सहकार्याबाबत वानखेडे यांचे अनेकदा आभार मानले आहेत व प्रत्यक्ष भेटून मिठी मारण्याची इच्छाही प्रकट केली आहे.

सीबीआयने कारवाई सुरू केल्यानंतर वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली असून, त्याच्या सुनावणीदरम्यान वानखेडे यांना 22 मेपर्यंत अटकेपासून संरक्षण देण्यात आले आहे. तसेच सीबीआयला सोमवारपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. समीर वानखेडेंनी तपासात सहकार्य करावे, तूर्तास त्यांना अटक करणार नाही, अशी ग्वाही सीबीआयने हायकोर्टाला दिली आहे.

जातीवरून त्रास दिल्याचा आरोप

वानखेडे यांनी याचिकेत आरोप केला की, एनसीबीने या प्रकरणात जी चौकशी केली, त्यात एनसीबीचे उपसंचालक ग्यानेश्वर सिंग यांनी आपल्याला जातीवरून त्रास दिला. एवढेच नव्हे, तर सिंग यांनी आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणातून सोडवण्यासाठी सीबीआयचा वापर केला.

संवाद न्यायालयासमोर

आपल्या याचिकेसोबत वानखेडे यांनी शाहरूख खानसोबत झालेल्या चॅटच्या प्रतीही न्यायालयात सादर केल्या. 3 ऑक्टोबर 2021 आणि 4 ऑक्टोबरचे हे चॅट आहेत. त्यात शाहरूखने वानखेडे यांना मुलाची म्हणजे आर्यनची काळजी घेण्याची विनवणी केली आहे. तसेच त्यांच्या सहकार्याबाबत आभारही मानले आहेत.

Back to top button