राष्ट्रवादीमध्ये आणखी दोन बॉम्ब फुटतील; प्रकाश आंबेडकर यांचा गौप्यस्फोट | पुढारी

राष्ट्रवादीमध्ये आणखी दोन बॉम्ब फुटतील; प्रकाश आंबेडकर यांचा गौप्यस्फोट

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : महाविकास आघाडीतील घटकपक्षांमध्ये अद्यापही समावेश न झालेले वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेससंदर्भात गौप्यस्फोट केला. राष्ट्रवादीत बरेच राजकारण घडायचे आहे. सध्या दोन बॉम्ब फुटलेत… अजून दोन बॉम्ब फुटायचे बाकी आहेत. त्यामुळे ‘वेट अँड वॉच’ जे काही बाहेर पडेल ते खरे बाहेर पडेल. त्यानंतर महाराष्ट्राचे राजकारण स्थिर होईल, असे भाकीत आंबेडकर यांनी वर्तवले आहे.

अकोले येथील दंगलीसंदर्भात प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादीतील अंतर्गत राजकारणावर भाकीत केले. महाराष्ट्रात स्वतंत्र निवडणूक लढविण्याची परिस्थिती असल्याची काँग्रेसने भूमिका घेतली आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बरेच राजकारण घडायचे आहे, असे ते म्हणाले.

अकोले येथील दंगल पुरस्कृत आहे, असे सांगतानाच सहा महिन्यांपूर्वी नागपूर एसआयटीने दिलेल्या अहवालात महाराष्ट्रात केव्हा आणि कधी काय घडू शकते हे नमूद केले आहे. त्या अहवालात ज्यांची नावे आहेत, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केल्याचे आंबेडकर यांनी सांगितले. त्यानुसार अहवालात ज्यांचे नाव असेल, जे दंगलीत सापडले असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.

दंगलीतून मतदान बदलण्याचा काळ संपला

राज्यात धार्मिक तेढ वाढविण्याचा प्रयत्न सुरू आहे. दंगेखोरांवर कडक कारवाई केली जात नाही, तोपर्यंत या दंगली थांबणार नाहीत, असे आंबेडकर म्हणाले. कर्नाटकमध्ये धार्मिकतेवर मतदान झाले नसून तेथील लोकांनी त्यांना जे योग्य वाटले त्यांना मतदान केले. त्यामुळे दंगलीतून मतदान बदलण्याचा काळ आता संपला आहे. कर्नाटकात दलितांनी भाजपविरोधात मतदान केले. त्यामुळे भाजपची मतांची टक्केवारी कमी झाली.

     माझा मतदारसंघ सुरक्षित

  • दक्षिण मध्य मुंबईतील जागा ठाकरे गटाने तुम्हाला लढवायला दिली, तर तुम्ही राहुल शेवाळेंविरोधात लढणार का… असा प्रश्न पत्रकारांनी केला असता, आंबेडकर यांनी, माझा सुरक्षित मतदारसंघ असताना तुम्ही माझा मतदारसंघ का बदलत आहात, असा सवाल केला.

Back to top button