वर्षातून चार आठवडे मराठी चित्रपट न दाखवल्यास 10 लाखांचा दंड : सुधीर मुनगंटीवार | पुढारी

वर्षातून चार आठवडे मराठी चित्रपट न दाखवल्यास 10 लाखांचा दंड : सुधीर मुनगंटीवार

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  वर्षातून किमान चार आठवडे मराठी चित्रपट न दाखवल्यास चित्रपटगृहांना 10 लाख रुपये दंड ठोठावण्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. मराठी सिनेमांना सिनेमागृहांमध्ये प्राईम टाईम उपलब्ध करून देण्याबाबतची बैठक आज मंत्रालयात सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्यात मुनगंटीवार यांनी ही दंडाची घोषणा केली आहे.

जर या अटीचे पालन केले नाही, तर परवाना नूतनीकरणाच्या वेळी या चित्रपटगृहांकडून हा दंड वसूल केला जाणार आहे. त्यासंदर्भात गृह विभागाला अधिसूचना देण्याचा निर्णय करण्यात आला. तसेच सिंगल स्क्रीन चित्रपटगृहामध्ये भाडे वाढवू नये, असाही निर्णय घेण्यात आला.

गेल्या काही वर्षांपासून मराठी सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर काही सिनेमांना थिएटर मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी येत असतात. त्यामुळेच येणार्‍या काळामध्ये थिएटरमध्ये मराठी सिनेमा प्रदर्शित करण्यासंदर्भातील कार्यप्रणाली तयार करण्यात येणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. बैठकीत सुधीर मुनगंटीवार यांनी येत्या 15 दिवसांमध्ये मराठी सिनेमा निर्मात्यांनी आपली निवेदने द्यावीत, जेणेकरून या विषयाबाबत विस्तृत बैठक 15 जूननंतर घेण्यात येईल, असे यावेळी सांगितले. या बैठकीला गृह विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, दादासाहेब फाळके चित्रनगरीचे सहव्यवस्थापकीय संचालक कुमार खैरे उपस्थित होते.

Back to top button