Raut Vs Somaiya : किरीट सोमय्या यांना काश्मीरला पाठवा : संजय राऊत - पुढारी

Raut Vs Somaiya : किरीट सोमय्या यांना काश्मीरला पाठवा : संजय राऊत

मुंबई, पुढारी ऑनलाईन : केंद्रीय तपास यंत्रणाच्या वाढत्या कारवाया पाहता महाविकास आघाडी सरकार आणि  भाजपमध्ये (Raut Vs Somaiya) आरोप-प्रत्यारोप होत आहेत. त्यामुळे राज्‍यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना हत्यासत्र सुरू असल्यामुळे परिस्थिती आणखीच चिघळली आहे.  “काश्मीरमध्‍ये दहशतवाद वाढला आहे. तिकडे ईडी, सीबीआय आणि किरीट सोमय्या यांना पाठवा”, अशी खोचक टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली.

संजय राऊत पत्रकारांशी बोलताना म्हणाले, “ईडी, सीबीआय आणि एनसीबी या तपास संस्थाना काश्मीरमध्ये पाठवा. ते खूप शक्तीशाली लोक आहे. दहशतवादी पळून जातील. तुम्ही इथे आमच्या सरकारवर केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून हल्ले करता आहात. तुम्ही या संस्था बदनाम केल्या आहेत. किरीट सोमय्यांना काश्मीरमध्ये (Raut Vs Somaiya) पाठवा. फिरू द्या त्यांना जम्मू, काश्मीर, अनंतनाग आणि बारामुल्लामध्ये. दहशतवाद्यांची कागदपत्रे आम्ही त्यांना देऊ. जम्मू-काश्मीर फिरत बसतील”.

“शरद पवार यांच्याविषयी चंद्रकांत पाटील यांनी ज्या शब्दात उल्लेख केला ते शोभते का? काश्मीरमध्ये त्या दहशतवाद्यांच्या संदर्भात बोला. त्यांना दम द्या आम्हाला शहाणपणा शिकवू नका. कलम ३७० नंतर परिस्थिती आटोक्यात आली की, नाही हे सांगता येणार नाही”

“तेथील परिस्थितीसंदर्भात बातम्या बाहेर येऊ दिल्या नाहीत. तिथे इंटरनेट बंद होते. तिथे अनेक बंधनं होती. त्यामुळे तेथील अनेक गोष्टी बाहेर आल्या नाहीत. परिस्थिती हाताबाहेर जात असताना सरकार काय करतं आहे. गृहमंत्र्यांनी समोर येऊन सांगावे”, असेही आव्‍हान संजय राऊत यांनी दिले.

चीनवरही सर्जिकल स्ट्राइक करायला हवा

संजय राऊत पुढे म्हणाले की, “काश्मिरी पंडीत, शीख नागरिक व बिहारी मजुरांचे खून पडत आहेत. या घटनांची संपूर्ण जबाबदारी केंद्र सरकारची आहे. चीन हा लडाख आणि तावांगमध्ये घुसला आहे. नुसत्या धमक्यांची भाषा करून हे थांबणार नाही. चीनवरही सर्जिकल स्ट्राइक करायला हवा”, असंही राऊत यांनी सांगितले.

“पाकिस्तानसोबत कसे संबंध ठेवावे याचा निर्णय सरकारला एकदा घेऊ द्या. मग आम्ही बोलू. तुम्ही तुमच्या मतलबाप्रमाणे राजकीय सोईच्या भूमिका घेता आणि काश्मीरची जनता रोज तिथे मरते आहे. हे चालणार नाही. काश्मिरची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे एवढेच सांगू शकतो”, असंही संजय राऊत यांनी सांगितले.

पहा व्हिडीओ : कशी झाली शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची सुरुवात?

Back to top button