राज्यात उष्णतेची लाट; बहुतांश ठिकाणी तापमान चाळीशीपार | पुढारी

राज्यात उष्णतेची लाट; बहुतांश ठिकाणी तापमान चाळीशीपार

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  राज्यात उष्णतेची लाट आली असून बहुतांश ठिकाणी तापमान चाळीशीपार गेले आहे. त्यातच पुढील काही दिवसांमध्ये पारा आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यातील तापमानाचा पारा सोमवारी दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढला आहे. आर्द्रतायुक्त आणि गरम हवेमुळे व उष्णतेमुळे अस्वस्थता जाणवणार असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, देशातील बहुतांश भागात 40 अंशांपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे.

जळगाव जिल्ह्यात 44.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. अकोला येथेही पारा 44 अंशाच्या पुढे गेला असून धुळे, परभणी, वर्धा येथे तापमान 43 अंशांपेक्षा अधिक असल्याचे दिसून आले. उन्हाच्या झळामुळे माणसांसह जनावरे व कोंबड्यांनाही उष्माघाताचा त्रास जाणवू लागला आहे.

झळांनी फळबागा करपल्या

मार्च आणि एप्रिल महिन्यात वादळी पावसाने तडाखा दिल्यानंतर मे महिन्यात उन्हाच्या झळा वाढू लागल्या आहेत. वाढत्या उष्म्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढून जमिनीतील ओलावा कमी झाल्यामुळे उन्हाळी पिकांना पाण्याचा तुटवडा भासू लागला आहे. पिकांची पाने करपू लागली असून केळी, संत्रा, मोसंबीसह फळांनाही चटका बसत आहे.

Back to top button