

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : कर्मचारी राज्य विमा महामंडळ अर्थात ईएसआयसीच्या माध्यमातून महाराष्ट्रात सात रुग्णालयांची उभारण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तर, डबेवाला आणि टॅक्सीचालकांना वैद्यकीय सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने माहिती गोळा करण्याच्या सूचना केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी कामगार आयुक्तांना दिल्या आहेत.
केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत संघटीत तसेच असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या विविध प्रश्नांवर बैठक घेतली. यावेळी कामगार क्षेत्रातील विविध संघटनांचे प्रतिनिधीही उपस्थित होते. ईएसआयसीच्या माध्यमातून राज्यात सात रुग्णालये उभारण्याची प्रक्रिया सुरू आहे. यापैकी काही रुग्णालयांसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. लवकरात लवकर या रूग्णालयांचे काम पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असून त्यामुळे कामगारांसाठी या रुग्णालयांच्या माध्यमातून अतिरिक्त एक हजार खाटांची सुविधा उपलब्ध होणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
बैठकीत मुंबईतील डबेवाल्यांनी आणि टॅक्सीचालकांनी केंद्राकडून वैद्यकीय सुविधा आणि निवृत्ती वेतन मिळावी, अशी मागणी केली. त्यावर, वैद्यकीय सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने डबेवाले आणि टॅक्सीचालकांची माहिती गोळा करण्याची सूचना केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी कामगार आयुक्तांना दिल्या आहेत. याबाबत अंतिम निर्णय घेण्याचे आश्वासनही त्यांनी दिल्याची माहिती मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी दिली.
सुभाष तळेकर यांच्यासह मुंबई टॅक्सी असोसिएशनचे समशेर सिंग यांनी केंद्रीय मंत्र्यांना मागण्यांचे निवेदन दिले. यात प्रामुख्याने डबेवाल्यांना वैद्यकीय सेवा आणि निवृत्ती वेतन मिळावे अशी मागणी करण्यात आली. या मागणीला प्रतिसाद देत त्यांनी संबंधित प्रशासनाला माहिती गोळा करुन आवश्यक कार्यवाही करण्याची सूचना केली.