

पुणे/मुंबई; पुढारी वृत्तसेवा : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून, १० मे रोजी त्याचे चक्रीवादळात रूपांतर झाल्याबरोबर महाराष्ट्रातील पाऊस कमी होईल. तसेच कमाल तापमानात ५ ते ६ अंशांनी वाढ होऊन पुन्हा कडक उन्हाळा सुरू होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने अंदमान बेटांसह बंगालच्या उपसागरात पावसाला सुरुवात झाली. ९ मे रोजी तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात व १० रोजी चक्रीवादळात रूपांतर होणार आहे. याचा परिणाम म्हणून ३६ राज्यांना पावसाचा इशारा दिला असला, तरीही महाराष्ट्रात मात्र पाऊस कमी होणार आहे.
पुणे वेधशाळेचे हवामान अंदाज विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी म्हणाले की, चक्रीवादळ हे ढगांतील आर्द्रता शोषून घेते… त्यामुळे १० मे रोजी ते सक्रिय होताच महाराष्ट्रात पाऊस कमी होऊन पुन्हा कडक उन्हाळा सुरू होण्याचे संकेत आहेत. पाऊस फक्त ९ मेपर्यंतच आहे. चक्रीवादळामुळे वाऱ्यांची खंडितता बंद होणार आहे. वादळी वारे ढगांतील बाष्प शोषून घेते, त्यामुळे राज्यात १० मेपासून प्रचंड उकाडा जाणवू शकतो. कमाल तापमान ४० अंशांवर जाण्याची शक्यता आहे.