काय होणार? महाराष्ट्राची उत्कंठा शिगेला, सत्‍तासमीकरणे बदलणार की, 'जैसे थे' राहणार? | पुढारी

काय होणार? महाराष्ट्राची उत्कंठा शिगेला, सत्‍तासमीकरणे बदलणार की, 'जैसे थे' राहणार?

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : या आठवड्यात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा फैसला घटनापीठ कोणत्याही क्षणी जाहीर करणार असल्याने राज्यभरातील उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठ 11 किंवा 12 मे रोजी हा निकाल देऊ शकते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदार अपात्र ठरले, तरी शिंदे-फडणवीस सरकारच्या बहुमतावर परिणाम होणार नसला, तरी सत्तेची समीकरणे मात्र बदलू शकतात.

असे झाले तर नवा मुख्यमंत्री कोण?

हा प्रश्न महाराष्ट्राच्या मनात घर करून बसला असून, घटनापीठाच्या निकालानंतरच्या घडामोडींमध्ये या प्रश्नाचे उत्तर शोधावे लागणार आहे. जाणकारांच्या मते, घटनापीठाच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात चार प्रकारच्या शक्यता निर्माण होऊ शकतात. त्यातील दोन शक्यता प्रबळ असून, उर्वरित दोन शक्यता परिस्थितीजन्य असू शकतात.

1) ‘जैसे थे’ : पहिली शक्यता म्हणजे मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह त्यांचे सोळाही आमदार घटनापीठाकडून अपात्र ठरवले जाणार नाहीत. घटनापीठ हे प्रकरण विधानसभेच्या अध्यक्षांकडे सोपवू शकते. तसे झाले तर विधानसभा अध्यक्ष हा सत्तारूढ पक्षाचाच असल्याने सरकारची परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवणे शक्य होईल. म्हणजे शिंदे-फडणवीस सरकारच्या सोयीचा निर्णय विधानसभा अध्यक्ष आपल्या अधिकारात घेऊ शकतात आणि सरकार स्थिर राहील.

2) नवा मुख्यमंत्री : दुसरी शक्यता धाकधूक निर्माण करणारी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सोळा आमदारांनी पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत राज्यघटनेच्या दहाव्या परिशिष्ठानुसार घटनापीठाने त्यांना अपात्र ठरवले, तर मुख्यमंत्री शिंदे यांना तडकाफडकी राजीनामा द्यावा लागेल. परिणामी, नव्या मुख्यमंत्र्यांसह नव्या सरकारची स्थापना करण्याची प्रक्रिया अटळ होऊन बसेल.

3) बहुमत कायम : मुख्यमंत्री शिंदे यांना पायउतार व्हावे लागले, तरी शिंदे-फडणवीस सरकार नव्या मुख्यमंत्र्यांसह पुन्हा सत्तेवर येईल. या सरकारच्या पाठीशी 164 आमदारांचे पाठबळ आहे. त्यापैकी मुख्यमंत्र्यांसह 16 आमदार अपात्र ठरले, तरी 145 हा बहुमताचा आकडा सरकार आरामात सिद्ध करू शकते. याचा अर्थ घटनापीठाचा निर्णय मुख्यमंत्री शिंदेंच्या विरोधात गेला, तरी सरकारला धोका नाही, हा भाजपकडून मांडला जाणारा मुद्दा मान्य करावा लागतो.

4) अजित पवार की फडणवीस की तिसरा कुणी? : मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह सोळा आमदार अपात्र ठरलेच, तर भाजपच्या डावपेचांचा भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडून विरोधी पक्षनेते अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात, ही शक्यता मध्यंतरी बळावली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजीनामा नाट्याने ही चर्चा थांबली असली, तरी अशी शक्यता जाणकार अजूनही नाकारत नाहीत. तसे झाले नाही तर मग पुन्हा सर्वांच्या नजरा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वळतील. कर्नाटकातील निवडणूक प्रचारात फडणवीस यांनी ‘मी पुन्हा येईन,’ अशी आपली ऐतिहासिक घोषणा केली आहे.

Back to top button