मुंबई, पुढारी वृत्तसेवा : सांताक्रुज येथे मुरलीधर पुरुषोत्तम नायक या वृद्धाची त्यांच्याच घरात काम करणार्या केअरटेकरने हत्या केल्याची घटना आज (दि.८) सकाळी उघडकीस आली. या हत्येमागे चोरीचा उद्देश असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे. घरातील सुमारे पावणेतीन ते तीन लाखांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. याप्रकरणी कृष्णा मानबहादूर पेरिवार या केअरटेकरविरुद्ध सांताक्रुज पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरु केला आहे. या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती.
याबाबत अधिक माहिती अशी की, सांताक्रुज परिसरात मुरलीधर हे त्यांच्या वयोवृद्ध पत्नीसोबत राहत होते. पती-पत्नी वयोवृद्ध असल्याने त्यांचा सांभाळ करण्यासाठी कृष्णा हा केअरटेकर म्हणून काम करत होता. सकाळी कृष्णाने मुरलीधर यांची गळा आवळून खून करुन कपाटातील कॅश आणि सोन्याचे दागिने घेऊन पलायन केले. हा प्रकार उघडकीस येताच सांताक्रुज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मुरलीधर यांना जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.
या हत्येनंतर कपाटातील कॅश आणि दागिने चोरीस गेल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे चोरीच्या उद्देशानेच ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हत्येनंतर कृष्णा पळून गेल्याने त्याचा पोलिसाकडून शोध सुरु आहे. सांताक्रुज पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे तीन ते चार पथक विविध ठिकाणी रवाना झाले आहे. लवकरच आरोपीला अटक करण्यात यश येईल, असे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा