चला पर्यटनाला : राणी बागेत पाहाल जैवविविधतेचा खजिना | पुढारी

चला पर्यटनाला : राणी बागेत पाहाल जैवविविधतेचा खजिना

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  मुंबईच्या बदलत्या चेहऱ्याची १६० वर्षांहून अधिक काळ साक्षीदार असलेली आणि शहराच्या मध्यवर्ती भागात ५२ एकरांपेक्षा जास्त पसरलेली राणी बाग किंवा वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान हे देशाच्या आर्थिक राजधानीतील सर्वात जुने सार्वजनिक उद्यान आहे. १८६१ मध्ये बांधलेल्या, मुंबईच्या या हिरवळीच्या खुणांना देशाच्या तत्कालीन सम्राज्ञी राणी व्हिक्टोरियाचे नाव देण्यात आले. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाई भोसले यांच्या नावावरून त्याचे वीर जिजामाता भोसले उद्यान असे नामकरण करण्यात आले. वयाची शतकोत्तरी साठी गाठल्यानंतरही तिला चिरतारुण्याचे वरदान लाभल्याने इथे वर्षभर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते.

सन १८६२ मध्ये लोकांसाठी खुले करण्यात आलेल्या, बोटॅनिकल गार्डनमध्ये प्राणीसंग्रहालय, डॉ. भाऊ दाजी लाड म्युझियम नावाचे संग्रहालय आणि इंग्लंडचा राजा एडवर्ड सातवा यांचा पुतळा आहे. राणीबाग हे विविध प्रकारच्या वनस्पती आणि जीवजंतूंचे घर आहे, ज्यात वनस्पतींच्या ८०० पेक्षा जास्त प्रजाती आणि ३ हजारपेक्षा जास्त झाडे आहेत. येथील जैवविविधतेमुळे ते निसर्गप्रेमी आणि छायाचित्रकारांसाठी एक लोकप्रिय ठिकाण बनले आहे.

बदलत्या काळाप्रमाणे राणी बागही बदलत गेली. सध्या राणीबागेच्या विकासाचा तिसरा टप्पा सुरू आहे. या टप्प्यामुळे प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांची विविधता आणि संख्या वाढेल अशी अपेक्षा आहे. बागेत आफ्रिकन विभाग, ऑस्ट्रेलियन विभाग आणि अमेरिकन विभाग अशा तीन वेगळ्या विभागांमध्ये अधिक प्राण्यांचे स्वागत करण्यासाठी सज्ज आहे. या नवीन विभागांमध्ये ज्या प्राण्यांचे स्वागत केले जाणार आहे त्यात जग्वार, झेब्रा, हुलक, गिबन्स आणि चित्ता यांचा समावेश आहे. प्राणीसंग्रहालयातील नवीन रहिवासी आशिया, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियासह विविध प्रदेशांमधून आणले जाणार आहेत.

राणी बाग हे असे ठिकाण आहे जिथे तुम्ही पट्टेरी वाघ, पेंग्विन, मगरी, बिबट्या, आणि हरणांचा कळप पाहू शकता. येथील रहिवाशांच्या समृद्ध विविधतेमुळे, प्राणीसंग्रहालयाला सर्व वयोगटातील लोक वारंवार भेट देतात. बुधवार वगळता आठवड्यातील कोणत्याही दिवशी तुम्ही राणीबागला भेट देऊ शकता. प्राणीसंग्रहालय लोकांसाठी सकाळी ९ ते संध्याकाळी ५.३० या वेळेत खुले असते. इथे रोज सरासरी ३१ हजार लोक भेट देतात

भारतातील सगळ्यात पहिला हम्बोल्ड पेंग्विन प्रकल्प २०१७ साली सुरू करण्यात आला. त्यामुळे इथे भेट देणाऱ्यांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली. परदेशातून आणलेले हे जीव आणि त्यांच्या पुढच्या पिढ्या आता सहजपणे नांदू लागल्या आहेत. त्यांची संख्याही आता दुप्पट झाली आहे. अनेक शाळांच्या सहली या कक्षाचे खास आकर्षण बनले आहे. या कक्षासमोरून चिमुरड्यांचे पाय तर निघतच नाहीत.

सर्व कसे अत्याधुनिक

सरपटणारे प्राणी, हजारो प्रजातीचे किटक इथे रोज नजरेस पडतात. खार, मुंगूस, वटवाघळे, यांचा तर मुक्त वावर पहायला मिळतो. त्यांच्या अनेक पिढ्या इथे नांदत आहेत. राणीबागेच्या आधी पासूनचे परदेशी वृक्ष लक्ष वेधून घेतात. निरिक्षण कक्ष, ठिकठिकाणी लावलेले सूचना फलक, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रसाधन गृहाची व्यवस्था, काचेची पारदर्शक प्रदर्शनी, बालसंगोपन कक्ष आणी पर्यटकांच्या पोटपूजेसाठी चविष्ठ पदार्थांची . रेलचेल असलेले कॅफे वाईल्ड, अशा सर्व सुविधा इथे उपलब्ध आहेत.

Back to top button