MHT CET Exam : एमएचटी सीईटी परीक्षा उद्यापासून | पुढारी

MHT CET Exam : एमएचटी सीईटी परीक्षा उद्यापासून

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : अभियांत्रिकी, वैद्यकीय, औषधनिर्माणशास्त्र, कृषी आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी महत्त्वाच्या असलेल्या एमएचटी सीईटी पीएसएम ग्रुपची परीक्षा येत्या ९ मे (मंगळवार) पासून विविध सत्रांत होत आहे. या परीक्षेची प्रवेश पत्र (हॉल तिकीट) सीईटी सेलने संकेतस्थळावर उपलब्ध केली आहे.

पीसीएम ग्रुपसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची सीईटी मंगळवार पासून सुरू होणार असून १३ मे रोजी संपणार आहे, तर पीसीबी ग्रुपची परीक्षा १५ मे पासून सुरू होणार असून २० मे रोजी संपणार आहे. या परीक्षेचे हॉल तिकीट १० मेपासून उपलब्ध होणार आहे.
विविध सत्रांत परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना सत्र आणि वेळा निश्चित करून तारीख आणि सत्र वेळांची माहिती प्रवेशपत्रावर देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत संकेतस्थळावरून प्रवेशपत्र डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढावी, प्रवेशपत्रावरील परीक्षेचा दिनांक, वेळ, परीक्षा केंद्राचा पत्ता आदी बाबी वाचून घेण्याच्या सूचना सीईटी सेलकडून देण्यात आल्या आहेत.

तसेच परीक्षेच्या दिवशी केंद्रावर वेळेपूर्वी पोहोचण्याची दक्षता विद्यार्थ्यांनी घ्यावी. परीक्षेस जाताना प्रवेशपत्राबरोबरच स्वतःचे मूळ ओळख प्रमाणपत्रासाठी पॅन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट यापैकी एक ओळखीचा पुरावा म्हणून आणणे बंधनकारक असल्याचे सीईटी सेलकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

एमएचटी सीईटी परीक्षेसाठी यंदा ६ लाख १९ हजार ०३३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये पीसीबी ग्रुपसाठी २ लाख ९५ हजार ८४४ आणि पीसीएम ग्रुपसाठी ३ लाख २३ हजार १८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

Back to top button