शरद पवारांच्‍या निवृत्तीच्‍या निर्णयाचा अर्थ काय? राजकीय विश्‍लेषक म्‍हणतात… | पुढारी

शरद पवारांच्‍या निवृत्तीच्‍या निर्णयाचा अर्थ काय? राजकीय विश्‍लेषक म्‍हणतात...

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार असल्याची घोषणा खासदार शरद पवार यांनी केली आहे. ‘लोक माझा सांगाती’ या शरद पवारांच्या राजकीय आत्मकथेच्या नव्या आवृत्तीच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. पक्षाचा नवा अध्यक्ष कोण होणार, हे पक्षातील वरिष्ठांनी ठरवावं, असंही पवारांनी सांगितलं. ( Sharad Pawar Resigns )

महाराष्ट्रात गेले काही दिवस राजकीय वर्तुळात अजित पवार भाजपमध्ये जाणार अशा चर्चांना उधाण आलं होतं. काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये चर्चा होत असल्याचं म्हटलं आहे. त्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी राष्ट्रवादीचं अध्यक्षपद सोडणं, यामुळे राज्यात नव्या समीकरणांना वेग येणार आहे.

पवारांची पुढची खेळी काय असेल? यावरच आजच्या निर्णयाचे महत्त्व

शरद पवारांच्या निवृत्त होण्याच्या निर्णय बद्दल जेष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक ज्ञानेश्वर बिजले म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यांनी गेल्या आठवड्यातच भाकरी फिरवावी लागेल असे स्पष्ट केले होते, त्याचीच पुढची कडी म्हणजे त्यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मध्यंतरी विद्यमान विरोधी पक्षनेते अजित पवार हे भाजपसोबत जाऊन सरकार स्थापन करणार अशी जोरदार चर्चा झाली होती. अशावेळी शरद पवार यांनी पक्षांतर्गत बदल करण्याचे सुतोवाच केले, तसेच युवकांना संधी देण्याची भूमिका मांडली होती. या पुढील काळात पक्षाचे अध्यक्षपद अन्य व्यक्तीला सोपवून पवार हे राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होतील, असे त्यांनी सांगितले. येत्या वर्षभरात लोकसभेच्या निवडणुका होत असून, त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस काय भूमिका घेणार हे महत्त्वाचे ठरणार आहे. ते भाजप बरोबर जाणार की विरोधी पक्षांबरोबर आघाडीचे राजकारण करणार, हे  पुढील काळात पाहणे महत्त्वाचे ठरेल, त्यामुळे पवार यांची पुढची खेळी काय असेल? यावरच त्यांच्या आजच्या निर्णयाचे महत्त्व अवलंबून राहील.

Sharad Pawar Resigns : राष्ट्रीय राजकारणात सक्रिय राहतील

पवार यांनी घेतलेल्या निर्णयाबाबत ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे म्हणतात की, वाढलेले वय आणि त्यामुळे शारीरिक हालचालींवर येणाऱ्या मर्यादांमुळे हा निर्णय घेतल्याची शक्यता आहे. आठवड्याभरापूर्वी पवार यांनी भाकरी फिरवावी लागेल, असे स्पष्ट केले होते. याची सुरुवात त्यांनी स्वतःपासून केल्याचे दिसते. तसेच शरद पवार यांनी राजकीय आणि सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेतलेली नाही. त्यांच्या राज्यसभेच्या खासदारकीची आणखी तीन वर्षे बाकी आहेत. त्यामुळे राष्ट्रीय राजकारणात सक्रिय राहतील, असं देखील चोरमारे म्हणाले.

Sharad Pawar Resigns : भविष्यात होणारा राजकीय भूकंप टाळला

पवार यांनी हा निर्णय पुस्तक प्रकाशनच्या कार्यक्रमाच्या भाषणात अगदी शेवटी ही घोषणा केली. याला एक राजकीय किनार आहे. मध्यंतरी विद्यमान विरोधी पक्षनेते अजित पवार हे पक्ष सोडून भाजपसोबत जाऊन सरकार स्थापन करणार अशी जोरदार चर्चा झाली होती. ती चर्चा अजूनही सुरु आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी निर्णय घेऊन भविष्यात होणारा राजकीय भूकंप टाळला आहे, असे मत जेष्ठ पत्रकार उदय तानपाठक यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा :

Back to top button