मुख्यमंत्री शिंदेंना त्यांची जागा दाखवायची वेळ : अजित पवार | पुढारी

मुख्यमंत्री शिंदेंना त्यांची जागा दाखवायची वेळ : अजित पवार

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : शिंदे फडणवीस सरकार हे लोकांच्या मनातील सरकार नाही. दगाफटका, गद्दारी करून आलेले हे सरकार आहे. घोटाळा करूनच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आहेत, त्यांना जागा दाखवायची वेळ आली आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी वज्रमूठ सभेत मुख्यमंत्र्यांवर कडाडून टीका केली. तसेच, न विचारता बातम्या केला जात असल्याने संभ्रम निर्माण होत असल्याचे सांगत अशा गोष्टींवर विश्वास ठेवण्याची गरज नसल्याचेही अजित पवार यांनी सांगितले.

अजित पवार यांच्या भूमिकेवरून अलीकडच्या काळात उलटसुटल चर्चा सुरू आहेत. आजच्या वज्रमूठ सभेत अजित पवार बोलणार का, याबाबतही साशंकता व्यक्त केली जात होती. मात्र, अजित पवार यांनी आज आपल्या आक्रमक भाषणात शिंदे- फडणवीस सरकारवर हल्ला चढवितानाच महाविकास आघाडीत एकजूट असल्याचे सांगत संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला. महाविकास आघाडीची एकी टिकवायला हवी. कार्यकर्त्यांनी दोन-तीन पावले मागे येण्याची तयारी ठेवली पाहिजे. वरिष्ठांनी मनाचा मोठेपणा दाखवायला हवा. जिंकून येण्याची क्षमता असणाराच महाविकास आघाडीचा उमेदवार असायला हवा, असे अजित पवार म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयाने या सरकारला नपुंसक सरकार म्हटले तरी या सरकारला ना जनाची उरली, ना मनाची. मुख्यमंत्री द्रौपदी मुर्मूना पंतप्रधान म्हणतात, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला निवडणूक आयोग म्हणाले. उद्योजकांसमोर बोलताना साडेतीन पन्नास कोटी म्हणतात, जमत नसेल तर नोट्स काढा, ते वाचून दाखवा, असा टोला अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. या सरकारला सत्तेवर येऊन दहा महिने झाले. पण, जनता काय करेल याचा विश्वास नसल्यानेच विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जात नसल्याचे अजित पवार म्हणाले. जनतेच्या पैशावर प्रसिद्धीसाठी वारेमाप उधळपट्टी सुरू आहे. जनतेच्या पैशावर यांचा उदो उदो सुरू आहे.

षड्यंत्राला बळी पडू नका

यशवंतराव चव्हाण ते उद्धव ठाकरे यांच्या काळातील खर्च आणि या सरकारच्या दहा महिन्यांतील खर्च काढा. मग कळेल की, सर्व मुख्यमंत्र्यांनी जाहिरातीवर केलेला खर्च कुठे अन् शिंदे सरकारचा खर्च कुठे, अशा शब्दांत त्यांनी सरकारला सुनावले. दरम्यान, आपापल्यात दुरावा निर्माण होऊ देऊ नका. जात, धर्म, पंथात दुरावा पाडून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचे काम शिंदे- फडणवीस सरकारचे सुरू आहे. या षड्यंत्राला बळी पडू नका, असे आवाहनही अजित पवार यांनी केले.

Back to top button