मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : समीर खान प्रकरणी एनसीबीच्या गांजा जप्ती दाव्यात तथ्य नाही, असा दावा समीर खान याचे सासरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी न्यायालयाच्या आदेशाचा हवाला दिला असून एनसीबीसारख्या केंद्रीय यंत्रणेला गांजा आणि तंबाखू यामधील फरक कळू नये, अशी खिल्लीही नवाब मलिक यांनी उडवली. समीर खान व इतर दोघांवर एनडीपीएस कायद्याच्या 27(अ) कलमांतर्गत दाखल केलेला गुन्हा रद्दबातल ठरतो,असेही मलिक म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालयात गुरुवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी 13 जानेवारी रोजी त्यांचे जावई समीर खान यांच्या अटकेबाबतची परिस्थिती सांगितली. एनडीपीएसच्या विशेष कोर्टाने 27 सप्टेंबरला समीर खान, करण सजनानी आणि राहिला फर्निचरवाला यांना जामीन दिला. यावेळी कोर्टाची लेखी ऑर्डर बुधवारी प्राप्त झाली आहे. जस्टीस जोगळेकर यांनी ही ऑर्डर जाहीर केली.
14 जानेवारी रोजी एनसीबीचे कर्मचारी माझ्या जावयाच्या घरी छापा मारण्यासाठी गेले. सर्व वृत्तवाहिन्यांवर दाखवले गेले की, मोठ्या प्रमाणावर गांजा सापडला. मात्र प्रत्यक्षात घरातून काहीच जप्त करण्यात आले नव्हते. करण सजनानी, राहिला फर्निचरवाला, समीर खान यांना फ्रेम केले गेले.
8 जानेवारी 2021 रोजी एनसीबीने सांगितले की, दोन पार्सल युनिव्हर्सल कार्गोतून ट्रेस केले गेले. 9 जानेवारी करण सजनानी जे वांद्रे येथे राहतात, त्यांच्या घरी छापा टाकला गेला. एनसीबीने अधिकृत प्रेस नोट काढून 200 किलो गांजा जप्त केल्याची बातमी दिली. त्याच दिवशी 9 जानेवारी रोजी एनसीबीच्या अधिकार्याने आपल्या मोबाईल नंबरवरून प्रेस नोट आणि चार फोटो पाठवले.
एका ब्रिटिश नागरिकाला अटक केली असल्याचे या प्रेस नोटद्वारे सांगितले. 9 जानेवारी रोजी फर्निचरवाला नावाच्या मुलीकडून साडेसात ग्रॅम गांजा जप्त केला गेला. त्या मुलीला त्याच दिवशी जामीन मिळाला. याच दिवशी देशभरात विविध ठिकाणी छापेमारी करण्यात आली. 12 जानेवारी रोजी रात्री 10 वाजता माझे जावई समीर खान यांना समन्स पाठवण्यात आले.
13 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले. दुसर्या दिवशी सकाळी पावणे दहा वाजता माझे जावई समीर खान एनसीबी कार्यालयात पोहोचले. तेथे आधीपासूनच वृत्तवाहिन्यांचे कॅमेर लागलेले होते. सर्व वृत्तवाहिन्यांवर माझ्या जावयाचा फोटो लावून ते अमली पदार्थाशी संबंधित असल्याचे सांगितले गेले.
अटक झाल्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेत एनसीबीने तीन महिने वेळ घालवला. 9 जानेवारी रोजी एनसीबीने केलेल्या कारवाईची प्रेस नोट आणि जप्त केलेल्या अमली पदार्थाचे फोटो एनसीबीचे अधिकारी यांच्या 9820111409 या मोबाईल नंबरवरून पत्रकारांना फॉरवर्ड करण्यात आले होते, असे मलिक म्हणाले.
एनसीबीने जप्त केलेले सर्व 18 नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेला पाठवण्यात आले. त्यापैकी 11 नमुन्यांत गांजा आढळला नाही. या अहवालाला कोणत्याही पक्षाने आक्षेप घेतलेला नाही. विशेष म्हणजे, अभियोग पक्षाने फेरतपासणीची मागणी आजपर्यंत केलेली नाही.
अभियोग पक्षाने म्हटले होते, की विश्लेषण अहवालातील तथाकथित विसंगती या प्रकरणाचा भाग आहेत. प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान त्यांची छाननी केली जाईल. मात्र, विश्लेषणाचा अहवाल नि:संदिग्धपणे निर्णायक असल्याचे समोर आल्यामुळे त्यांचे म्हणणे मान्य करता येत नाही.