मुंबई : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 'लोक माझे सांगाती' या आत्मकथनाचा दुसरा भाग 2 मे रोजी प्रकाशित होणार असून या पुस्तकात शरद पवार यांनी काही धक्कादायक खुलासे केले आहेत. सध्या भाजप आणि उद्धव ठाकरे यांची युती संपुष्टात आली असली तरी शरद पवार यांना 2019 मध्येच भाजप-शिवसेनेत वाढलेले अंतर हेरले होते. या मित्रपक्षात वाढलेले अंतर आमच्यासाठी शुभसंकेत होता, असे शरद पवार यांनी या पुस्तकात म्हटले आहे. भाजपला राजकीय वर्चस्वासाठी शिवसेनेचे उच्चाटन करायचे होते, असा दावाही त्यांनी या पुस्तकातून केला आहे.
उद्धव ठाकरेंनी 2019 मध्ये भाजपसोबत युती असताना आणि युतीला बहुमत मिळाले असतानाही मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावर भाजपशी काडीमोड घेत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडी स्थापन करत सत्ता मिळविली. उद्धव ठाकरे यांच्या या निर्णयापासून भाजप आणि उद्धव ठाकरे यांच्यात निर्माण झालेला राजकीय संघर्ष अजूनही संपलेला नाही. शरद पवार यांनी ही युती तुटण्यास कोणती कारणे होती यावर आपल्या आत्मकथेत प्रकाश टाकला आहे.
2019 पूर्वी विधानसभा निवडणुकीत शिवसेना 171 आणि भाजप 117 जागा लढत असे, पण 2019 नंतर चित्र बदलले. 2019 च्या जागावाटपात शिवसेनेने 124 जागा तर भाजपने 164 जागा मिळविल्या. स्वत:च्या बळावर बहुमत मिळवत शिवसेनेचे ओझं उतरवून ठेवायचे, असा चंग, अतिआत्मविश्वासात दंग भाजपने बाळगला होता. नारायण राणे हे शिवसेनेच्या द़ृष्टीने गद्दार. पण त्यांना भाजपमध्ये विलीन करून घेत सेनेच्या जखमेवर मीठ चोळण्यात आले. राज्यातील 50 मतदारसंघांत बंडखोरांचे आव्हान होते. त्यातील बहुतेकांनी ठोकलेले दंड नेत्यांच्या आशीर्वादने आणि पक्षाच्या बळावर होते, असे शरद पवार यांनी या पुस्तकात म्हटले आहे.
नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोन्ही नेत्यांच्या देहबोलीतून आणि बोलण्यातून शिवसेनेविषयी त्यांची फारशी सहानुभूती नसल्याचे दिसत होते. शिवसेनेच्या मात्र भाजपकडून अपेक्षा पूर्वीप्रमाणे कायम होत्या. भाजप आणि शिवसेना यांच्यात संवादाची गरज असे तेव्हा शीर्षस्थ नेतृत्व 'मातोश्री'वर येऊन संवाद घडवत असे. पण बदललेल्या परिस्थितीत उद्धव ठाकरे यांची भाजपकडून हीच अपेक्षा होती.
शिवसेनेची ताकद असलेल्या शहरी भागात तिचं उच्चाटन केल्याशिवाय आपल्याला राज्यात वर्चस्व स्थापन करता येणार नाही, असा सरळ सरळ राजकीय हिशेब भाजपचा होता. याचमुळे आपल्या राजकीय अस्तित्वावर भाजप उठला आहे या विषयी शिवसेना नेतृत्व आणि त्यांच्या कार्यकर्त्यात तीव्र संताप होता. सत्तेत एकत्र असल्याने त्याचा उद्रेक झाला नाही. पण आग धुमसत होती, असेही शरद पवारांनी निदर्शनास आल्याचे पुस्तकात म्हटले आहे.
शरद पवार यांच्या राजकीय आत्मकथन असलेल्या 'लोक माझे सांगाती' या पुस्तकाच्या दुसर्या भागाचे प्रकाशन 2 मे रोजी होणार वाय. बी. चव्हाण सेंटर येथे होणार आहे.