आमदार निधी : आमदारांच्या निधीमध्ये एक कोटी रुपयांची वाढ | पुढारी

आमदार निधी : आमदारांच्या निधीमध्ये एक कोटी रुपयांची वाढ

मुंबई; पुढारी वृत्तसेवा

मतदारसंघातील विविध विकासकामे करण्यासाठी विधानसभा आणि विधान परिषद आमदारांना मिळणाऱ्या निधीत १ कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आमदारांना यापुढे आता ३ ऐवजी ४ कोटी रुपये विकास निधी मिळेल.

जिल्हा वार्षिक योजनेतून लहान विकासकामांना कमी प्रमाणात निधी उपलब्ध होतो. या निधीतून शाळा खोल्या, अंगणवाडी केंद्र, व्यायामशाळा, स्मशानभूमी, शौचालये, कोल्हापूर पद्धतीचे लहान बंधारे बांधली जातात.

लोकांच्या या गरजा पूर्ण करण्याकरता विधानसभा व विधान परिषद सदस्यांना २०११-१२ पासून स्थानिक विकास कार्यक्रमासाठी २ कोटी रुपये निधी देण्यात येत होता. पण बांधकाम व इतर साहित्याच्या दरात वाढ झाल्यामुळे तसेच वास्तूंची देखभाल व दुरुस्तीसाठी निधी कमी पडत असल्याचे पाहून २०२०-२१ मध्ये आमदार निधी ३ कोटी रूपये करण्यात आला होता.

मात्र, २०२०-२१ च्या अर्थसंकल्पातील ‘अनुदानाच्या मागण्या’ या विषयावरील चर्चेला उत्तर देताना वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी आमदार निधीमध्ये १ कोटी रुपयांची वाढ करण्याबाबत ग्वाही दिली होती. त्यानुसार गुरुवारी शासनाने दोन्ही सभागृहातील आमदारांना २०२०-२१ या आर्थिक वर्षापासून ४ कोटी रुपये विकास निधी देण्यात बाबत शासन आदेश जारी केला आहे.

हे ही वाचलं का?

Back to top button