

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री असताना मला जे करता आले ते मी केले; परंतु ज्या पद्धतीने पाठीत वार करून सरकार पाडले त्याचा बदला घ्यायचा आहे आणि तो घेणारच. जन्मभर लक्षात राहील अशी अद्दल घडवणार, असा थेट इशारा शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी शिंदे गटाला गुरुवारी दिला.
भारतीय कामगार सेनेच्या सर्वसाधारण सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटासह भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. राज्याचे 'निरुद्योग' मंत्री उदय सामंत आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच जोडे बनवणार्या एका कंपनीबरोबर 2 हजार 300 कोटी रुपयांचा करार केला. पण ती कंपनी तामिळनाडूत गेली आणि सरकार जोडे पुसत बसले. महाविकास आघाडी सरकारने 25 हून अधिक उद्योग महाराष्ट्रात आणले. मात्र आता शेपट्या घालून बसणारे सरकार आहे. ज्या शिवसेनेचा जन्मच मुळी भूमिपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी झाला त्या भूमिपुत्रांवर अन्याय करून येऊ घातलेले उद्योगधंदे बाजूला स्वत:च्या राज्यात नेत आहेत. तरी यांच्या शेपट्या आतच! हे कसले बाळासाहेबांचे विचार, असा प्रश्नही ठाकरे यांनी केला.