

धारावी : पुढारी वृत्तसेवा : धारावी मेन रोडवरील बनवारी कंपाऊंड परिसरात सुन्न करणारी घटना घडली असून जन्मदात्या पित्याने आपल्या दोन वर्षाच्या चिमुकल्याचा गळा आवळून खून केला. आणि मृतदेह प्लॅस्टिकच्या पिशवीतून खाडी लगतच्या कचऱ्यात फेकल्याची माहिती आज (दि.१९) उघडकीस आली. असद (वय २) असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. याप्रकरणी शाहूनगर पोलिसांनी चिमुकल्याचे वडील रेहमत शेख (वय २३) याला मोठ्या शिताफीने अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रमजान सुरु असल्याने मंगळवारी रात्री १० च्या सुमारास बनवारी कंपाऊंड झोपडपट्टीत उपवास सोडण्यासाठी लगबग सुरु होती. तेव्हा या चिमुकल्याने आपल्या आईकडे चीज बॉल खाण्याचा हट्ट धरला. ते ऐकून रेहमत चिमुकल्याला घेऊन घराबाहेर पडला. तेव्हा चिमुकल्याच्या आईला वाटले चीज बॉल घेऊन देण्यासाठी रेहमत दुकानात गेला असावा. म्हणून ती गप्प राहिली. मात्र बराचवेळ झाला तरी दोघेही घराकडे न परतल्याने ती प्रचंड घाबरली. लागलीच तिने आपल्या दिराला सोबत घेऊन दोघांचा शोध सुरु केला. पहाट झाली तरी दोघेही मिळून न आल्याने ती प्रचंड मानसिक तणावाखाली आली. पहाटे साडेपाचच्या सुमारास शाहूनगर पोलिसांना माहीम धारावी उड्डाण पुलालगत असलेल्या केमकर चौक परिसरात प्लॅस्टिकच्या पिशवीत एका चिमुकल्याची बॉडी असल्याची माहिती मिळाली.
चिमुकल्याच्या घरच्यांनी घटनास्थळी धाव घेत चिमुकल्याचा मृतदेह ओळखला. घटनास्थळी दाखल झालेल्या शाहूनगर पोलिसांनी तात्काळ चिमुकल्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र दाखल करण्यापूर्वीच चिमुकल्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. चिमुकल्याच्या काकाने फिर्याद दाखल करताच गुन्ह्यातील गांभीर्य लक्षात घेऊन शाहूनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कांबळे यांनी सहायक पोलीस निरीक्षक आव्हाड, चव्हाण व गुन्हे प्रगटीकरण अशी दोन पथके तयार करून चिमुकल्याच्या वडिलाचा शोध सुरु केला. शोध सुरु असताना चिमुकल्याचा वडील युपीला पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तात्काळ पोलिसांनी त्या परिसरात छापा टाकून मोठ्या शिताफीने त्याला अटक केली. पोलीस ठाण्यात आणून त्याची कसून चौकशी करताच गुन्ह्याचे पितळ उघडे पडले. खुनाचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून शाहूनगर पोलीस अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा