भाजपसोबत गेलेल्यांची ईडीकडून पाठराखण

ईडी
ईडी

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  भाजपा पक्षाबरोबर साटेलोटे करणाऱ्या राजकीय नेत्यांना अभय देण्याच्या अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून ईडीच्या अधिकाऱ्यांविरोधात फौजदारी कारवाईचा आदेश द्या, अशी मागणी करणाऱ्या जनहित याचिकेची उच्च न्यायालयाने दखल घेतली. प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठाने याचिकेवर उन्हाळ्याच्या सुटीनंतर २६ जूनला सुनावणी घेण्याचे निश्चित केले आहे.

ईडीचे अधिकारी पक्षपात करीत आहेत. चौकशीचा ससेमिरा लावल्यानंतर भाजपामध्ये गेलेल्या नेत्यांची पाठराखण केली जात आहे, असा आरोप करून सामाजिक कार्यकर्ते नवीन लाडे यांच्या वतीने अॅड. नितीन सातपुते यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर मंगळवारी प्राथमिक सुनावणी झाली.

ईडी ही केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील मिधे सरकारच्या सांगण्यावरून काम करीत आहे. त्यामुळेच फुटीर नेत्यांविरोधातील चौकशी थांबवली आहे, असा आरोप करून ईडीच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी कारवाईचे आदेश द्या, अशी विनंती केली. याची दखल घेत खंडपीठाने याचिकेवर २६ जूनला सुनावणी घेण्याचे निश्चित केले.

  • अॅड. सातपुते यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांनी सुरुवातीला विरोधी पक्षातील आनंदराव अडसूळ, अर्जुन खोतकर, यशवंत जाधव व त्यांच्या पत्नी यामिनी जाधव, भावना गवळी, प्रताप सरनाईक आदी राजकीय नेत्यांविरोधात विविध गैरव्यवहारप्रकरणी चौकशीचा ससेमिरा लावला. चौकशीच्या नावाखाली समन्स बजावले. मात्र हे नेते भाजपा आश्रयाला जाताच त्यांची चौकशी थांबवण्यात आली. याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news