अमित शहा आजपासून मुंबई दौऱ्यावर; सर्व मंत्र्यांच्या कामाचा हिशेब होणार | पुढारी

अमित शहा आजपासून मुंबई दौऱ्यावर; सर्व मंत्र्यांच्या कामाचा हिशेब होणार

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय गृहमंत्री आणि ज्येष्ठ भाजपा नेते अमित शहा शनिवार आणि रविवार असे दोन दिवस राज्याच्या दौऱ्यावर येत आहेत. ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना रविवारी महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यासाठी शहा येत असले तरी या दौऱ्यात ते शिंदे-फडणवीस सरकारच्या कामगिरीचा आढावा घेतानाच मंत्र्यांचीही जिल्हानिहाय झाडाझडती घेऊ शकतात.

अमित शहा हे शनिवारी दिल्लीहून सायंकाळी सात वाजता मुंबई विमानतळावर दाखल होतील. साडेसात वाजता ते सह्याद्री अतिथीगृहावर मुक्कामी पोहोचतील. शनिवारी रात्री साडेसात ते दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी सकाळी दहा पर्यंतचा त्यांचा वेळ राखीव ठेवण्यात आला आहे. तथापि याच राखीव वेळेत रात्री उशिरापर्यंत बैठका आणि झाडाझडती होणार असल्याचे समजते.रविवारी नवी मुंबईत खारघरमध्ये होणाऱ्या ऐतिहासिक सोहळ्यात आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यासाठी शहा यांचा हा दौरा असला तरी याच दौऱ्यात शिंदे – फडणवीस सरकारच्या कामांचा आढावा, आगामी मुंबई महापालिका निवडणुकीची पूर्वतयारी आणि लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने बैठकांचे सत्र शहा यांच्या उपस्थितीत होऊ घातले आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह राज्याच्या सर्वच मंत्र्यांना शहा भेटणार असून जिल्हानिहाय कामाची झाडाझडती घेतली जाण्याची शक्यता भाजपातील सूत्रांनी वर्तविली आहे.

राज्यातील सर्व मंत्र्यांना उपस्थितीच्या सूचना देण्यात आल्या असून, अमित शहा यांच्या बैठकीत काय विचारले जाईल, याचा अंदाज मंत्री घेत आहेत. रविवारी सकाळी अमित शहा हे राजभवन येथील हेलिपॅडवरुन नवी मुंबईतील खारघरच्या आंतरराष्ट्रीय कार्पोरेट पार्कला पोहचतील. दुपारी बारा ते दीड या कालावधीत ज्येष्ठ निरुपणकार डॉ. दत्तात्रय नारायण ऊर्फ आप्पासाहेब धर्माधिकारी यांना २०२२ चा महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च असा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळा शहा यांच्या हस्ते होईल. त्यानंतर अडीच वाजण्याच्या सुमारास शहा गोव्याला रवाना होतील.

मंत्रिमंडळ विस्तार होणार?

अमित शहांच्या याआधीच्या दौऱ्यात मंत्रिमंडळ विस्तारावर ते काय भूमिका घेतील याकडे भाजप-शिवसेना नेत्यांचे लक्ष लागले होते. मात्र त्यावेळी त्यांनी काहीही भूमिका घेतली नाही. मात्र अमित शहा यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना उधाण आले आहे.

मुंबईचाही आढावा

भाजपाच्या दृष्टीने मुंबई महापालिका निवडणुकीतील विजय महत्वाचा आहे. विविध कारणांमुळे या निवडणुका लांबल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आणि ठाकरे गटाकडे असणारी सहानुभुतीचे वातावरण हा कळीचा मुद्दा बनला आहे. या स्थितीवरही अमित शहा यांच्या उपस्थितीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

Back to top button