‘गंगा भागीरथी’वरून बारा तासांत झाला साक्षात्कार; महिला आयोगासह विभागाच्या मंत्र्यांचा घूमजाव | पुढारी

‘गंगा भागीरथी’वरून बारा तासांत झाला साक्षात्कार; महिला आयोगासह विभागाच्या मंत्र्यांचा घूमजाव

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  विधवा म्हणू नका, ही एक मागणी पूर्ण करण्यापेक्षा प्रसिद्धीचा सोस धरल्याने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर आणि महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी तोंडघशी पडावे लागले आहे. विधवांसाठी गंगा भागीरथी हा शब्द वापरण्याचा प्रस्ताव तयार करण्याची मंत्र्यांची सूचना आणि आमचीच मागणी पूर्ण होत असल्याचे सांगत श्रेय घेऊ पाहणार्‍या आयोगाच्या अध्यक्षांना चक्क घूमजाव करावे लागले.

विधवा महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी विधवाऐवजी गंगा भागीरथी शब्द वापरण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याची सूचना मंत्री लोढा यांनी विभागाच्या प्रधान सचिवांना दिली. मात्र, यावर समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्याने मंत्री लोढा यांनी महिला आयोगाच्या सूचनेनंतरच या नामबदलाचा प्रस्ताव तयार करण्याची सूचना दिल्याचे सांगत अंग झटकले. त्याचा पुरावा म्हणून महिला आयोगाचे पत्रच त्यांनी समोर मांडले.

दरम्यान, विधवाऐवजी ‘गंगा भागिरथी’ (गं. भा.) हा शब्द वापरण्याबाबत प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिल्याबद्दल चाकणकर यांनी मंत्री लोढा यांचे आभार मानत त्यांचे अभिनंदन करणारे ट्विट केले. शिवाय, आयोगाच्या प्रस्तावामुळेचे हे शक्य होत असल्याची भावना व्यक्त करत श्रेयही घेतले. परंतु, महिला आयोग आणि महिला व बालविकास विभागाची नसती उठाठेव चांगलीच अंगलट आली. चाकणकर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससह काँग्रेस आणि ठाकरे गटातील नेत्यांसह अनेकांनी विरोधाचा सूर लावताच महिला आयोगाच्या अध्यक्षांना घूमजाव करत गंगा भागीरथी या शब्दालाही विरोध असल्याची भूमिका जाहीर केली. मात्र, लोढा यांनी हे सर्व प्रकरण चाकणकरांच्या शिफारशीवर ढकलल्याने काही काळ चाकणकरांचा मोबाईल ‘नॉट रिचेबल’ होता.

एकल शब्दाचा विसर पडला

मागच्या सरकारच्या काळात तत्कालीन महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी एकल हा शब्द रूढ करण्याची संवेदनशीलता दाखविली होती. सरकार दफ्तरी, योजनेच्या नावात विधवा, परित्यक्त्या असे शब्द वापरण्यावजी एकल या शब्दावर भर दिला जात होता. मात्र, आता महिला सन्मानाची भाषा करणार्‍यांना या शब्दाचा विसर का पडला, हे मात्र कळू शकले नाही.

Back to top button