

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राज्यात आगामी निवडणुका या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली शिवसेना, भाजप आणि रिपाइंसह मित्र पक्ष लढवतील, असा दावा उपमुुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. निवडणुकीत जागावाटपावरून कोणताच वाद होणार नसून पुन्हा आम्हीच सत्तेवर येणार, असा ठाम विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.
देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत विविध प्रश्नांना दिलखुलासपणे उत्तरे दिली. त्यावेळी बोलताना त्यांनी आगामी निवडणूका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले, एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत आणि जो मुख्यमंत्री असतो तो नेता असतो. त्यामुळे एकनाथ शिंदे हे आमचे सर्वांचे नेते असून त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार. निवडणुकीतही शिवसेना, भाजप आणि रिपाइं, मित्रपक्ष अशी आमची युती असेल. निवडणुकीत आम्ही जागांचे योग्य वाटप करणार आहोत. त्यानुसार आम्ही निवडणूक लढणार असून जागावाटपावरून आमच्यात कोणताही वाद उद्भवणार नाही. त्याचबरोबर हे सरकार स्थिर असून या सरकारमध्ये कुठलाही बदल होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या होणार्या राजकीय आरोप-प्रत्यारोपावरूनही फडणवीस यांनी भाष्य केले. ते म्हणाले, देशाच्या राजकारणात बदल होत असतात हे नवीन नाही. पण महाराष्ट्रात कोणी एकमेकांचे दुश्मन नाही आहेत. आम्ही एकमेकांच्याविरुद्ध कितीही बोललो तरी एकमेकांच्या समोर येऊ शकतो, चहा पिऊ शकतो ही परिस्थिती आहे, असेही फडणवीस म्हणाले.
विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्याऐवजी महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे त्यांचे सरकार पुन्हा येऊच शकत नाही, असा दावा करतानाच सर्वोच्च न्यायालय त्यांचा राजीनामा रद्द करून त्यांना पुन्हा कसे मुख्यमंत्रिपदी बसवतील, असा सवालही त्यांनी उपस्थित केला; पण न्यायालय योग्य तो निकाल देईल, असा विश्वासही त्यांनी वर्तवला.
महाविकास आघाडीच्या वज्रमुठीचा फोटो मी पाहिला असून त्याला भेगा पडलेल्या दिसत आहेत. अशी भेगा पडलेली वज्रमूठ आमचा मुकाबला करू शकत नाही. आमची वज्रमूठ ही विकासाची आहे, असा टोला फडणवीस यांनी वाशीम जिल्ह्यातील रिसोड येथील सभेत बोलताना लगावला.