कोर्टाच्या निकालाआधी घालमेल वाढली, भाजप-राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेने शिंदे गट अस्वस्थ | पुढारी

कोर्टाच्या निकालाआधी घालमेल वाढली, भाजप-राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेने शिंदे गट अस्वस्थ

मुंबई; दिलीप सपाटे : राज्यातील सत्तासंघर्षावर झालेल्या सुनावणीचा निकाल येत्या 15 मेपूर्वी येणार आहे. या निकालापूर्वी राज्यात राजकीय घालमेल वाढत चालली आहे. निकाल जर एकनाथ शिंदे गटाच्या विरोधात गेला, तर भाजप-शिवसेना सरकार धोक्यात येण्याची शक्यता आहे. अशावेळी सरकार वाचविण्यासाठी भाजप राष्ट्रवादीसोबत नवा घरोबा करू शकतो. त्याद़ृष्टीने पडद्याआड हालचाली सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. मात्र, भाजप-राष्ट्रवादीचे समीकरण जुळून येण्याच्या चर्चेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तंबूत अस्वस्थता निर्माण झाली आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल विरोधात गेला आणि शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरलेच, तर सरकारही कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे पडद्याआड सरकार वाचविण्यासाठी भाजपने राष्ट्रवादीशी संधान साधण्याचे प्रयत्न सुरू केले असून, राष्ट्रवादीचा त्याला प्रतिसाद मिळत असल्याची चर्चा राजकीय गोटात आहे. विशेषतः, गेल्या काही दिवसांत शरद पवार यांनी भाजपला अनुकूल अशी घेतलेली भूमिका सर्वांना संभ्रमात टाकणारी आहे.

अजित पवार यांचे मध्येच काही तास नॉट रिचेबल होणे हादेखील राजकीय आजार असल्याची चर्चा आहे. त्यातच आता अंजली दमानिया यांनी अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याचे वक्तव्य करून भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीच्या चर्चेला तोंड फोडले आहे. त्यांनी हे ट्विट आताच का केले, हा प्रश्न सर्वांना पडला आहे. राष्ट्रवादीत फूट पडण्याची जोरदार चर्चा असून, काँग्रेसचे काही आमदारही भाजपच्या संपर्कात असल्याचे समजते. नव्या सत्ता समीकरणाच्या शक्यतेने उद्धव ठाकरे यांच्या गोटातही अस्वस्थता असून, त्यांनी मंगळवारी शरद पवार यांची भेट घेत त्यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला.

अजून मंत्रिमंडळातील वीस खाती रिक्त

राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या वारंवार वावड्या उठल्या. मात्र, त्यानंतरही भाजपने मंत्रिमंडळ विस्ताराला मान्यता दिली नाही. शिंदे गटातून सातत्याने मंत्रिमंडळ विस्ताराची मागणी होत असतानाही भाजपने हा विस्तार रोखून धरला. भाजपने निकालाच्या शक्यता तपासून आणि नवी समीकरण जुळवायचे झाल्यास मंत्रिमंडळात पुरेशा जागा शिल्लक असाव्यात म्हणून विस्तार लांबणीवर टाकल्याची चर्चा आहे. भाजपने एकाचवेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या काही आमदारांना गळाला लावण्याचे सुरुवातीपासूनच प्रयत्न सुरू ठेवले आहे.
दरम्यान, अंजली दमानिया यांनी केलेले ट्विट तथ्यहीन असल्याचे शिंदे गटाचे नेते आणि शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.

निकालाची डेडलाईन ठरली

उद्धव ठाकरे गटाने एकनाथ शिंदे यांच्यासह 16 बंडखोर आमदारांना अपात्र करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली आहे. या याचिकेसह अन्य याचिकांवरील सुनावणी महिनाभरापूर्वी संपली असून, आता 15 मेपूर्वी सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायमूर्तींचे खंडपीठ आपला निकाल देणार आहे.

Back to top button