‘महिंद्रा अँड महिंद्रा’चे माजी अध्यक्ष केशब महिंद्रा यांचे निधन | पुढारी

‘महिंद्रा अँड महिंद्रा’चे माजी अध्यक्ष केशब महिंद्रा यांचे निधन

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : महिंद्रा अँड महिंद्राचे माजी अध्यक्ष केशब महिंद्रा यांचे बुधवारी वयाच्या 99 व्या वर्षी निधन झाले. त्यांनी 1963 ते 2012 यादरम्यान, 48 वर्षे महिंद्रा समूहाच्या फ्लॅगशिप कंपनीचे अध्यक्ष म्हणून काम केले. त्यानंतर ते या फर्मचे चेअरमन एमेरिटस होते.

केशब महिंद्रा हे भारतातील सर्वात वयस्कर अब्जाधीश आहेत. त्यांची एकूण संपत्ती 1.2 अब्ज डॉलर आहे, अशी माहिती ‘फोर्ब्स’ने नुकतीच प्रसिद्ध केली होती.

अल्प जीवनचरित्र

केशब महिंद्रा यांचा जन्म 9 ऑक्टोबर 1923 रोजी सिमला येथे झाला. त्यांनी अमेरिकेतील पेनेसिल्व्हेनिया विद्यापीठातून व्हार्टनमधून पदवीचे शिक्षण घेतले. 1947 मध्ये त्यांनी स्वतःच्या घरच्या कंपनीत काम करायला सुरुवात केली. तेव्हा त्या कंपनीचा मुख्य व्यवसाय हा विलीज जीप तयार करणे हा होता. 1963 मध्ये त्यांनी अध्यक्षपद स्वीकारले. केशब निवृत्त झाल्यानंतर त्यांचे पुतणे, आनंद महिंद्रा यांनी कंपनीची सूत्रे स्वीकारली. आता, हा समूह ऑटोमोबाईल, ऊर्जा, सॉफ्टवेअर सेवा, रिअल इस्टेट, आदरातिथ्य आणि संरक्षण या क्षेत्रांत कार्यरत आहे.

कंपनी कायद्यावरील सच्चर कमिशन, एमआरटीपी आणि केंद्रीय उद्योग सल्लागार परिषद अशा अनेक समित्यांमध्ये सहभागी होण्यासाठी केंद्र सरकारने केशब महिंद्रा यांची वेळोवेळी निवड केली. 2004 ते 2010 पर्यंत ते पंतप्रधानांच्या व्यापार आणि उद्योग परिषदेचे सदस्य होते.

सेल, टाटा स्टील, टाटा केमिकल्स, इंडियन हॉटेल्स, आयएफसी आणि आयसीआयसीआय या खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील विविध कंपन्यांच्या संचालक मंडळांचे ते सदस्य होते. असोचॅम व एम्प्लॉयर्स फेडरेशन ऑफ इंडिया या संस्थांमध्ये त्यांनी प्रमुख पदे भूषवली आहेत.

1985 मध्ये युनियन कार्बाईड इंडिया लिमिटेड या कंपनीचे ते अध्यक्ष होते. डिसेंबर 1984 मध्ये या कंपनीच्या भोपाळमधील कीटकनाशक प्लांटमध्ये गॅस गळती होऊन 15 हजार जणांचा मृत्यू झाला होता.

Back to top button