मुंबई; वृत्तसंस्था : जागतिक मंदीच्या काळातही भारतीय नागरिक विमान प्रवास, चित्रपटाची तिकिटे खरेदी करण्यासह कुटुंबासह घराबाहेर जेवणावर सर्वाधिक खर्च करत असल्याचे मंगळवारी जाहीर करण्यात आलेल्या एका अहवालात म्हटले आहे. आर्थिक वर्ष २०२३ मध्ये फ्लाइट तिकिटांवर ग्राहकांचा खर्च ८३ टक्क्यांनी वाढला असून हॉटेल्सवरील खर्च जवळपास दुप्पट झाला आहे.
फुल स्टॅक पेमेंट्स आणि बँकिंग प्लॅटफॉर्म रेजरपेच्या अहवालानुसार, एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीत ऑनलाइन ट्रॅव्हल एग्रीगेटर्समधील व्यवहारांमध्ये २२४ टक्के वाढ झाली आहे. चित्रपटांवरील ग्राहकांच्या खर्चात तब्बल १७३ टक्के वाढ झाली आहे आणि 'पठाण' चित्रपटाच्या लॉन्चिंगमुळे मल्टिप्लेक्स व्यवहारात दररोज सरासरी ७० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
कॅब पेमेंटवरील खर्च ७ पट वाढला : को वर्किंग स्पेसेसमध्ये देखील व्यवहारांमध्ये २४५ टक्क्यांनी मोठी वाढ झाली आहे, कॅब सेवांसाठी केलेल्या पेमेंटची संख्या सातपट वाढली आहे, कारण महामारीची भीती कमी झाली आहे. रेजरपेचे चीफ बिझनेस ऑफिसर राहुल कोठारी म्हणाले, आर्थिक वर्ष २०२३ हे भारतासाठी आशा, ताकद आणि नवचैतन्य देणारे वर्ष ठरले आहे, ज्यामध्ये सर्व क्षेत्रांतील व्यवहारांमध्ये झपाट्याने वाढ झाली.
दरम्यान, सर्वात मोठा बदल म्हणजे ब्रॉडबँड खर्च जवळजवळ ८० टक्क्यांनी कमी झाला असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.. आर्थिक वर्ष २०२३ मध्ये, बाहेर खाण्यावरचा खर्च २.५ पटीने वाढला आणि व्यवहाराचे प्रमाण मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत १६२ टक्क्यांनी वाढले. रेजरपेच्या ऑफलाइन पेमेंट प्लॅटफॉर्म, इजेटेप वर केलेल्या व्यवहारांनुसार, स्टोअरमधील पेमेंट मूल्य ८८ टक्क्यांनी वाढले आणि बहुतेक महानगरांमध्ये व्यवहारांची संख्या दुप्पट झाली आहे.