शरद पवार ‘अदानींचे सांगाती’? | पुढारी

शरद पवार ‘अदानींचे सांगाती’?

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : हिंडेनबर्ग अहवाल प्रकरणावरून काँग्रेसकडून उद्योगपती गौतम अदानींसह केंद्र सरकारवर जोरदार टीका सुरू असताना सहकारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने या प्रकरणात वेगळी भूमिका घेतल्याने विरोधी पक्षातील मतभेद समोर आले आहेत. त्यातच आता शरद पवारांच्या ‘लोक माझे सांगाती’ या आत्मकथेत गौतम अदानी यांच्यावर स्तुतिसुमने उधळत त्यांच्या जुन्या मैत्रीचे पदरही समोर आल्याने राजकीय वर्तुळात या सबंधांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

अदानी यांची संसदेच्या संयुक्त समितीकडून चौकशी करण्यासाठी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली असताना शरद पवार यांनी घेतलेल्या भूमिकेने काँग्रेसला धक्का बसला आहे. शरद पवारांनी हिंडेनबर्ग अहवालामध्ये भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांना जाणूनबुजून लक्ष्य करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. गौतम अदानी यांचे समर्थन करताना त्यांनी हिंडेनबर्ग अहवालावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

एका परदेशी संस्थेने अदानींबाबत वक्तव्य केले. या वक्तव्याने देशात गदारोळ माजला. अशा प्रकारची विधाने यापूर्वीही काही जणांनी केली होती. त्यावरून संसदेत गोंधळही झाला होता. पण, यावेळी त्याला विनाकारण जास्त महत्त्व देण्यात आले. हा अहवाल आणणारा कोण आहे, त्याचा विचार होणे आवश्यक होते. त्याचे नाव यापूर्वी कधी ऐकले नव्हते, असे शरद पवार यांना म्हटले होते.

त्यांच्या अहवालाने देशात गदारोळ माजतो आणि त्याचा फटका देशाच्या अर्थव्यवस्थेला बसतो. या गोष्टींकडे आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाही, अशा शब्दांत पवार यांनी हा अहवाल फेटाळून लावला होता.

पवारांच्या या भूमिकेने काँग्रेसला कोड्यात टाकले असताना शरद पवार आणि अदानी यांच्यातील मैत्रीची चर्चा सुरू झाली आहे. शरद पवारांनी आपल्या ‘लोक माझे सांगाती’ या आत्मकथेत शरद पवारांनी गौतम अदानी यांचा उल्लेख करत त्यांच्यावर स्तुतिसुमने उधळली आहेत.

काय म्हणाले पवार

आत्मकथेतील पान क्रमांक 123 वर शरद पवार यांनी म्हटले आहे की, गौतम अदानी नावाच्या तरुणाचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. अलीकडे खूप मोठ्या प्रमाणात त्यांचा बोलबाला झाला आहे. या तरुण उद्योजकाला मी अनेक वर्षांपासून ओळखतो. कमालीचा कष्टाळू आणि साधा. शून्यातून त्याने आपलं आजचं साम्राज्य उभं केलं. लोकलमध्ये छोट्या वस्तूंची विक्री करण्यापासून या माणसाच्या उद्योजकतेला सुरुवात झाली. यानंतर काही छोटे व्यवसाय करून गौतम यांनी काही पैसे गाठीला बांधले. मग तो हिर्‍यांच्या व्यवसायात पडला. तिथेही पैसे मिळत होते. पण गौतम यांना त्याच्यात रस नव्हता. पायाभूत सुविधांच्या उभारणीच्या उद्योगात पडण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा होती.

मुंदरा बंदराचे आव्हान पेलले

या मधल्या काळात अदानी यांनी बंदर उभारणीचा पुष्कळ अभ्यास केला. गुजरातचे मुख्यमंत्री चिमणभाई पटेलांचे आणि त्यांचे चांगले संबंध होते. त्यांनी चिमणभाईंकडे गुजरातमधलं मुंद्रा बंदर विकसित करण्याचा प्रस्ताव ठेवला. मुंद्रा वाळवंटी भागातलं बंदर आहे. तिथून पाकिस्तानची सीमारेषा नजीक आहे. या वस्तुस्थितीची जाणीव चिमणभाईंनी गौतम अदानी यांना दिली. गौतम यांनी प्रतिकूल परिस्थितीतही हे शिवधनुष्य पेललं. आज 50 हजार एकर जमिनीवरचं हे बंदर देशातलं सर्वांत मोठं आणि अद्ययावत बंदर आहे, असे शरद पवार यांनी लिहिले आहे.

ऊर्जा निर्मिती क्षेत्रात येण्याचा सल्ला दिला

गौतम नंतर कोळसा पुरवण्याच्या व्यवसायातही आले. मी गौतम यांना सुचवलं, वीज प्रकल्पांसाठी कोळसा पुरवण्याबरोबर ऊर्जानिर्मितीच्या क्षेत्रातही तुम्हीच उतरा. एकदा प्रफुल्ल पटेल यांच्या वडिलांच्या स्मृतिदिनानिमित्त गोंदिया इथे गौतम आणि मी एकत्र होतो. त्यावेळी बोलताना प्रफुल्ल पटेल यांनी भंडारा जिल्ह्यात उद्योजकांनी गुंतवणूक करण्यासाठी शरद पवार यांनी मदत करावी, अशी भावना व्यक्त केली. मी म्हणालो की, उद्योग येतील. पण तुम्हालाही सहकार्य करावं लागेल. आज गौतम अदानी आले आहेत. त्यांनी मी विनंती करतो की, ऊर्जानिर्मितीसाठी या परिसरात त्यांनी प्रकल्प उभा करावा.

गौतम यांनीही त्यांच्या भाषणात माझ्या विनंतीला विधायक प्रतिसाद दिला. सर्वसाधारणपणे व्यासपीठांवरच्या वक्तव्यांतून फार काही घडतंच असं नाही. पण गौतमनी हा विषय लावून धरला. त्यानं भंडार्‍यात ऊर्जानिर्मिती प्रकल्प मार्गी लावला. प्रकल्प पूर्ण झाल्यावर तेथून तीन हजार मेगावॅट वीजनिर्मिती होईल. गौतम यांनी ऊर्जानिर्मितीच्या क्षेत्रात मोठी झेप घेतली. आज जवळपास बारा हजार मेगावॅट वीजनिर्मितीचे त्यांचे प्रकल्प उभारणीच्या प्रक्रियेत आहेत. रात्रंदिवस काम करणारा आणि अतिशय साधा असणारा हा तरुण उद्योजक जमिनीवर पाय ठेवून आहे, असेही पवारांनी आपल्या आत्मकथेत नमूद म्हटले आहे.

पवार कुटुंबाचे अदानींशी असेही सबंध

– बारामतीच्या अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्र्स्टने गेल्या वर्षी विद्यार्थी फेलोशिप प्रदान कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून अदानी यांना बोलावलं होते.
– आमदार रोहित पवार हे गौतम अदानींची गाडी चालवत त्यांना एका कार्यक्रमाला घेऊन गेले होते.
– यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने दिल्या जाणार्‍या ‘शरद पवार फेलोशिप इन अ‍ॅग्रीकल्चर’च्या समारोप कार्यक्रम प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यासोबत उद्योजक गौतम अदानी, प्रीती अदानी हे देखील उपस्थित होते.

Back to top button