महाराष्ट्रात धमक्यांचे पीक : भाजप, काँग्रेस, ठाकरे गट, मनसे; बॉलिवूड कलाकारांनाही धमक्या | पुढारी

महाराष्ट्रात धमक्यांचे पीक : भाजप, काँग्रेस, ठाकरे गट, मनसे; बॉलिवूड कलाकारांनाही धमक्या

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्रात सध्या धमक्यांचे पीक आले आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर बॉम्ब लावला असल्याची धमकी पोलिस कंट्रोल रुमला फोन करुन देण्यात आली होती. त्यापूर्वी मनसे, काँग्रेस, ठाकरे गट एवढेच नव्हे तर बॉलिवूड कलाकारांनाही धमकी देण्यात आली. तर दुसरीकडे काही नेत्यांना असुरक्षित असल्याच्या भावनेने पछाडले आहे. त्यांनी पोलिस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. राज्याच्या प्रमुख नेत्यांनाच असुरक्षित वाटत असेल तर सर्वसामान्य जनतेचा विचार न केलेलाच बरा, असे यावरुन दिसून येते.

गृहमंत्र्यांच्या घरासमोर बॉम्ब ठेवल्याची धमकी

नागपूरपासून सु्मारे ३० किलोमीटर दूर असलेल्या कन्हान या गावातून एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने त्याने गृहमंत्र्यांच्या नागपूर येथील घरासमोर बॉम्ब ठेवल्याची धमकी नागपूर पोलीस कंट्रोलला दिली होती. त्यानंतर नागपूर पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली होती. खुद्द गृहमंत्र्यांच्या घरासमोर बॉम्ब असल्याची अफवा असल्याने पोलिसांची चांगलीच दमछाक उडाली.

अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरण

अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल केल्याप्रकरणी अनिक्षा जयसिंघानी आणि तिच्या बुकी वडिलांना अटक करण्यात आली होती. सध्या तिला जामिन मिळाला आहे. अमृता फडणवीस यांनी या प्रकरणी पोलिस तक्रार दिल्यानंतर एकानंतर एक स्फोटक माहिती समोर आली होती.

नितीन गडकरी यांनाही धमकी

दोन महिन्यांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात धमकीचा फोन आला होता. एक दोन नव्हे तर चक्क तीन वेळा हे धमकीचे फोन आले होते. यावेळी चक्क १० कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे पोलिस यंत्रणा संतर्क झाली होती. या प्रकरणी पोलिसांनी जयेश पुजारीला बेळगाव येथून अटक केली. विशेष म्हणजे तो बेळगावच्या तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता.

संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर शिवाजी पार्कमध्ये सकाळच्या सुमारास क्रिकेटच्या स्टंपने हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी ठाण्यातून तीन तर भांडूप येथून दोन जणांना अटक केली होती. परंतु, अजूनही या हल्ल्याचे खरे सुत्रधार सापडलेले नाहीत.

सलमानलाही धमकी

बॉलिवूड अभिनेता सलमान खान यालाही गेल्या काही महिन्यांमध्ये जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. गोल्डी ब्रारच्या टोळीने ही धमकी दिल्याचे समोर आले होते. त्यानंतर सलमानच्या घरासमोर कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

मनसे नेते जाधव यांना धमकी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि मनसे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. मुंब्रा डोंगरावर असलेला अनधिकृत दर्गा आणि मशिदीच्या विरोधात आवाज उठवल्याने अविनाश जाधव यांना धमकी मिळाल्याचा दावा मनसेने केला होता.

आव्हाडांच्या हत्येची सुपारी

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यासह कुटुंबीयांच्या हत्येची सुपारी देण्यात आल्याची कथित ऑडियो क्लिप व्हायरल झाली होती. त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ठाणे महापालिकेचे प्रभारी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना मारहाण केली होती.

संजय राऊत यांची सुरक्षा वाढवली

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना आलेल्या धमकीच्या पत्रानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. त्यानंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. धमकी मिळाल्यानंतर त्यांनी थेट मुंबई पोलीस आयुक्त आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले होते. त्यात त्यांनी श्रीकांत शिंदे यांच्यावर आरोप केले होते.

माझा मेटे होणार – चव्हाण

सध्या माझ्यावर पाळत ठेवली जात आहे. मी कुठे जातोय. गाडीने कुठे गेलो, कुणाला भेटलो, यावर पाळत ठेवली जात आहे. माझाही विनायक मेटे करण्याची चर्चा सुरू आहे, असे खळबळजनक विधान माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केले होते. त्यानंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती.

हेही वाचा : 

Back to top button