

पुढारी ऑनलाईन डेस्क: Ladki Bahin Yojana | महाराष्ट्र विधानसभा निवडणुकात गेमचेंजर ठरलेल्या मुख्यमंत्री लडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. राज्यातील जवळपास ५ लाख महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आल्याची माहिती स्वत: राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.
मंत्री तटकरे यांनी X वरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, दिनांक २८ जून २०२४ आणि दिनांक ३ जुलै २०२४ रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना ''मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजनेतून वगळण्यात येत आहे. पुढे त्यांनी यापूर्वीच्या लाभार्थी महिलांना लाडकी बहिण योजनेतून वगळल्याचेदेखील स्पष्ट केले आहे.
संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला - २,३०,०००, वय वर्षे ६५ पेक्षा जास्त असलेल्या महिला - १,१०,०००, कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या, स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या - १,६०,००० अशा एकूण ५,००,००० अपात्र महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आले आहे. तसेच इतर सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबध्द असल्याचे आदिती तटकरे यांनी एक्सवरील पोस्टवरून सांगितले आहे.