बूट पॉलिशवाल्यांच्या आयुष्याचा उडणार रंग; रेल्वेच्या जाचक अटी | पुढारी

बूट पॉलिशवाल्यांच्या आयुष्याचा उडणार रंग; रेल्वेच्या जाचक अटी

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : सकाळी हमखास प्लॅटफॉर्मवर बुटाची चकाकी करुन ऑफिस गाठणाऱ्या मुंबईकरांना आता बुट पॉलिशवाले दिसेनासे होणार आहेत.

रेल्वे स्थानकात नविन बूट पॉलिश निविदा प्रक्रिया राबविण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. त्यामुळे मुंबईसह संपूर्ण देशातील रेल्वे स्थानकांवर वर्षानुवर्षे बूट पॉलिश करून आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ येणार आहे. याचा सर्वाधिक फटका मुंबईतील बूट पॉलिश करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बसणार आहे.

सीएसएमटी ते कल्याण दरम्यान स्थानकांवर २५० बूट पॉलिश कर्मचारी गेल्या ५० वर्षांपासून कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांना महिन्याला ५०० रुपये भाडे रेल्वेकडे भरावे लागते. यात दरवर्षी सहा टक्के वाढ होते १ २००६ पूर्वीचे जे पॉलिशवाले बूट आहेत, त्यांचे परवाने नूतनीकरण करावे, असे निर्देश रेल्वे बोर्डाने १७ मार्च २०२३ रोजी देत नव्याने निविदा मागविल्या आहेत.

या निविदेतील रक्कम भरणे या कर्मचाऱ्यांना शक्य नसल्याने ही निविदा रद्द करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेचे राज्य सचिव भिमेश मुतुला यांनी दिल्लीत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन चर्चा करून बूट पॉलिश कर्मचाऱ्यांची बाजू मांडली आहे.

Back to top button