आर्यन खान याच्यासह ८ जणांच्या जामिनाचा मार्ग मोकळा | पुढारी

आर्यन खान याच्यासह ८ जणांच्या जामिनाचा मार्ग मोकळा

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : कॉर्डेलिया क्रूझमध्ये आयोजित ड्रग्ज पार्टीप्रकरणी अटक करण्यात आलेला बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्यासह आठ आरोपींना राष्ट्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) गुरुवारी दुपारी न्यायालयासमोर हजर केले.

दोन्ही पक्षांमध्ये तीन तासांहून अधिक काळ चाललेल्या युक्तिवादानंतर न्यायालयाने आठही आरोपींना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या आरोपींच्या जामिनाचा मार्ग मोकळा झाला असून जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी होणार आहे.

एनसीबीच्या पथकाने शनिवारी 2 ऑक्टोबरच्या रात्री कॉर्डेलिया क्रूझवर छापेमारी करून आर्यन खान याच्यासह त्याचा मित्र अरबाज मर्चंट, मुनमुन धमिचा, नुपूर सारिका, इश्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकर, गोमित चोप्रा अशा आठ जणांना काही प्रमाणातील ड्रग्ज आणि रोख रकमेसह ताब्यात घेत चौकशी सुरू केली. एनसीबीने याप्रकरणी गुन्हा दाखल करून 3 ऑक्टोबरच्या दुपारी आर्यन याच्यासह अरबाज आणि मुनमुन हिला अटक केली.

आरोपींच्या कोठडीची मुदत संपत असल्याने एनसीबीने गुरुवारी दुपारी त्यांना न्यायालयात हजर केले. एनसीबीच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी युक्तिवाद केला.

आठही आरोपींचा एकमेकांंशी संबंध आहे. याप्रकरणात आणखी आरोपींना अटक करून त्यांच्याकडे तपास सुरू आहे. तपासात प्रगती आहे. गुरुवारी दुपारी साडेबारा वाजता ड्रग्ज पुरवणार्‍या एका मुख्य विदेशी सप्लायरला अटक करण्यात आली आहे. त्याची चौकशी सुरू आहे, असे सिंग म्हणाले. सिंग यांनी या आठ जणांना 11 ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडीची मागणी केली.

आर्यन खान याला आणखी कोठडी देण्याची गरज नाही. आर्यनची अरबाजसोबत मैत्री आहे. आर्यन अरबाजसोबतची मैत्री नाकारत नाही. पण, बाकीच्या गोष्टींशी त्याचा संबंध नाही. आर्यनकडून सापडलेल्या चॅटमधून हे ड्रग्ज बाबत असल्याचे स्पष्ट होत नाही. आर्यनची प्रतीकसोबत चॅटिंग झाली.

त्यामध्ये रेव्ह पार्टीचा उल्लेख नाही. तसेच, प्रतीकची अरबाजसोबत ओळख आहे. प्रतीकने अरबाजला स्वंतत्ररीत्या बोलावले होते. अरबाज आणि आर्यन सोबत गेले नव्हते. एनसीबी आर्यनचा अन्य आरोपींशी संबंध असल्याचे रंगवत असलेले चित्रही खरे नाही, असा युक्तिवाद आर्यन खान याची बाजू त्याच्या वकिलांनी मांडली.

अरबाज मर्चंट याच्या वकिलांनी ही आर्यनची अरबाजसोबत मैत्री आहे, हे मान्य करत युक्तिवाद केला. या मैत्री व्यतिरिक्त अन्य आरोपींशी अरबाज याचा काही संबंध नाही. तसेच अरबाजच्या वकिलांनी एनसीबीने जप्त केलेल्या ड्रग्जवर प्रश्न उपस्थित केले. तर, मुनमुन फक्त क्रूझवर होती. तिला अटक करण्यात आली. असे असेल तर सर्व प्रवाशांना अटक केली पाहिजे होती. एनसीबीला सर्व काही एका रूममध्ये सापडले.

मुनमुनची कोठडी का मागितली जात आहे. या कोठडीच्या अर्जामध्ये मुनमुन हीच्याविषयी काहीच नाही. मुनमुन ही अरबाज तसेच आर्यन खानला ओळखत नाही. मग तिच्या कोठडीची मागणी का केली जात आहे, असा युक्तिवाद करत मुनमुन हिच्या वकिलांनी सीसीटीव्ही फुटेज दाखवण्याची मागणी केली.

न्यायालयात आठही आरोपींच्या वकिलांनी युक्तिवाद केला. अखेर न्यायालयाने एनसीबीला आरोपींकडे चौकशी आणि तपासासाठी पुरेसा कालावधी मिळाला आहे. त्यामुळे आरोपींच्या वाढीव कोठडीची आवश्यकता नसल्याचे मत न्यायालयाने व्यक्त करत आठही आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

आरोपी हे तपासात सहकार्य करणार असतील तर, जामीन अर्जावर सुनावणी घेण्यास होकार दिला. मात्र आरोपींच्या जामीन अर्जावर आपले म्हणणे मांडण्यासाठी वेळ मागितला.

त्यानंतर ही सुनावणी शुक्रवारी ठेवण्यात आली. त्यामुळे सर्व आठ आरोपींना गुरुवारची रात्र न्यायालयीन कोठडीत राहावे लागले आहे. दरम्यान, हे प्रकरण आता पुढे विशेष न्यायालयाकडे वर्ग करण्यात आले आहे.

विदेशी ड्रग्ज तस्कराला बेड्या

कॉर्डेलिया क्रूझमध्ये आयोजित ड्रग्ज पार्टीप्रकरणी दाखल गुन्ह्यात एनसीबीने एका विदेशी ड्रग्ज तस्कराला वांद्रे येथून अटक केली आहे. या प्रकरणातील ही 17 वी अटक आहे.त्याच्याजवळून मेफेड्रोन ड्रग्ज जप्त केले आहे.

आर्यन खान आणि अरबाज मर्चंट यांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे एनसीबीने बुधवारी रात्री अचित कुमार याला अटक केली.

ही या प्रकरणातील 17 वी अटक होती. तो या दोघांना गांजा पुरवत असल्याची माहिती आहे. एनसीबीने अचित कुमार याच्या घरातून काही प्रमाणात गांजा जप्त केल्याचे समजते. अचित कुमार याला 9 ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली आहे.

कारागृहात प्रवेश नाकारला

एनसीबीने आठही आरोपींना न्यायालयातून कारागृहात नेले. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कारागृह प्रशासनाने आरोपींना कारागृहात प्रवेश नाकारला. अखेर एनसीबीच्या पथकाने आरोपींना एनसीबी कार्यालयात नेले आहे.

कोरोना चाचणी करून शुक्रवारी आरोपींना कारागृहात नेण्यात येणार असल्याची माहिती मिळते. दरम्यान, आरोपींच्या कुटुंबीय आणि नातेवाइकांना आरोपींना भेटण्याची परवानगी न्यायालयाने दिली आहे.

Back to top button