सत्ता हवी; पण काम नको, हे चालणार नाही : अजित पवार | पुढारी

सत्ता हवी; पण काम नको, हे चालणार नाही : अजित पवार

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील कामकाजाबद्दल विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार संतापले असून, तुम्हाला सत्ता हवी; पण काम नको, हे चालणार नाही, अशा शब्दांत त्यांनी सरकारला खडसावले.

अधिवेशनाचे शनिवारी सूप वाजल्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारच्या कामकाजावर बोट ठेवले. ते म्हणाले, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्र्यांची सभागृहातील उपस्थिती अगदी नगण्य होती. मंत्री उपस्थित नसल्याने प्रश्न, लक्षवेधी राखून ठेवण्याची वेळ अध्यक्षांवर अनेकदा आली. मंत्र्यांनी दिलेल्या माहितीत त्रुटी राहिल्याने माहिती सुधारून घेण्याचे निर्देश अध्यक्षांना द्यावे लागले. माझ्या राजकीय कारकिर्दीतले अशाप्रकारचे हे पहिले अधिवेशन असेल. अधिवेशनाबद्दल सरकारची एकप्रकारे अनास्था, बेफिकिरी जाणवली, अशी टीकाही पवार यांनी केली.

तुम्हाला मंत्री व्हायचे आहे. सरकारी गाडी, बंगला, सिक्युरिटी पाहिजे; पण काम करायचे नाही, हे चालणार नाही. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय यायचा तेव्हा येईल. परंतु, जोपर्यंत सत्तेत आहात, तोपर्यंत तरी काम करा, असे बोल त्यांनी सत्ताधार्‍यांना सुनावले. तसेच विधिमंडळात आमदारांकडून जनतेचे प्रश्न मांडले जातात. परंतु, सरकार याकडे गांभीर्याने बघणार नसेल, तर जनताच यांना गांभीर्याने घेईल, असा इशाराही पवार यांनी दिला.

अधिवेशन काळात शेतकरी, कष्टकरी, महिला, विद्यार्थी तसेच समाजातील विविध घटकांचे प्रश्न मांडण्याचा विरोधकांनी प्रयत्न केला; पण सत्तारूढ पक्षाने सभागृहात गोंधळ आणि विधिमंडळाच्या पायर्‍यांवर आंदोलन करण्याचा नवा पायंडा सुरू केला आहे. सत्तारूढ पक्षाने सत्तेच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडवायचे असतात. सत्ताही उपभोगायची आणि आंदोलनही करायचे, हे लोकशाहीसाठी योग्य नसल्याचे पवार म्हणाले.

सत्ताधारी पक्षाने विधिमंडळ आवारात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात केलेले आंदोलन हे कायद्याचे उल्लंघन व संसदीय परंपरांना काळिमा फासणारे होते. त्याबद्दल पवार यांनी निषेध व्यक्त केला. या अधिवेशनामध्ये महाविकास आघाडीने चांगली भूमिका घेतली होती. वेगवेगळ्या आयुधांचा वापर करून सभागृहात आपले प्रश्न मांडण्यात आले, हेही पवार यांनी नमूद केले.

Back to top button