राहुल गांधींना 'त्या' घाण्याला जुंपले तर त्यांना सावरकरांच्या वेदना कळतील : मुख्यमंत्री शिंदे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : सावरकर हे देशाचे दैवत आहे. त्यांचा अवमान राहुल गांधी करत आहेत. पण ज्या सेल्युलर जेलमध्ये सावरकर यांना घाण्याला बांधले होते तेथे एकदा राहुल गांधी यांनी जाऊन यावे. एक दिवस जरी राहुल गांधी यांना त्या घाण्याला जुंपले तर त्यांना सावरकरांच्या वेदना कळतील, असा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चढवला.
विरोधकांनी मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री विधानसभेत उभे राहिले तेव्हा विरोधक सभागृहात नव्हते. त्यामुळे सत्तारूढ आमदारांसमोर हे उत्तर देत मुख्यमंत्री शिंदे यांनी राहुल गांधी, उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला.
राहुल गांधी यांच्या विरोधात सत्तारूढ आमदारांनी जोडेमार आंदोलन केल्याच्या निषेधार्थ विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले, याचा संदर्भ देत शिंदे म्हणाले, दोन वर्षाची शिक्षा झाली तर खासदारकी जाईल, हा कायदा काँग्रेसचे सरकार असताना झाला. लालूप्रसाद यादव, जयललिता, मोहमद फैजल अशा अनेक नेत्यांची खासदारकी या कायद्याने गेली आहे. पण तेव्हा निदर्शने झाली नाहीत. ओबीसींचा राहुल गांधी यांनी अवमान केला म्हणून राहुल गांधींना शिक्षा झाली. त्यामुळे राज्यातील जनता त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा शिंदे यांनी दिला.
गेल्या अडीच वर्षांत मुंबईचा विकास झाला नाही. निवडणूक आली की सातत्याने मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, अशी आवई उठविण्यात येते. ही एकच टोपी मुंबईकरांना किती वेळा घालणार, मुंबईकर आता टोपी घालणार नाही. तो सूज्ञ असून तुम्हाला निवडणुकीत त्याचे उत्तर द्यावे लागेल, असे सांगताना शिंदे यांनी मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची यंत्रणेमार्फत योग्य ती चौकशी केली जाईल, अशी घोषणा केली.
आडमुठ्या आणि अहंकारी धोरणामुळे विकासाचे विमान मुंबईच्या धावपट्टीवर रुतून बसले होते. आता विमानाने टेकऑफ घेतला असून हीच त्यांची पोटदुखी आहे. आम्ही धडाकेबाज निर्णय घेत असल्याने यांच्या छातीत धडकी भरली असून पायाखालची वाळू सरकली आहे. कुणाची खासगी मालमत्ता किंवा प्रायव्हेट लिमिटेड म्हणून सरकार चालवत नाही, असा सणसणीत टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नाव न घेता लगावला.