महाराष्ट्रात उष्णता, पूर अन् दष्काळाचा अलर्ट

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : वारंवार होणाऱ्या हवामानातील बदलामुळे राज्यातील शेतकरी, सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत. अशात आता येत्या काही महिन्यांत महाराष्ट्रात उष्णतेची लाट येणार असून यानंतर पाण्याची टंचाई आणि अतिवृष्टीमुळे जीवसृष्टीला तसेच पिकांना मोठा धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा आंतर-सरकारी पॅनेल ऑन क्लायमेट चेंज (आयपीसीसी) च्या सहाव्या मूल्यांकन अहवालात देण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य मोठ्या प्रमाणावर पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे पर्जन्यमानाच्या पद्धतींमध्ये होणारे कोणतेही बदल शेतीवर आणि घरांसाठी आणि उद्योगांसाठी पाण्याच्या उपलब्धतेवर लक्षणीय परिणाम करू शकतात, असे असर सोशल इम्पॅक्ट अॅडव्हायझर्स या सोशल इम्पॅक्ट स्टार्ट अपच्या अहवालाच्या विश्लेषणात नमूद केले आहे.
महाराष्ट्र हे प्रमुख कृषी राज्य असल्याने तापमान आणि पर्जन्यमानातील बदलांचा पीक उत्पादन आणि अन्नसुरक्षेवर महत्त्वपूर्ण परिणाम होऊ शकतो, असा अंदाज त्यात व्यक्त करण्यात आला आहे. काही पिके वाढण्यास कठीण होऊ शकतात, तर इतरांना उबदार हवामानाचा फायदा होऊ शकतो, असेही पुढे सुचवले आहे.
अलिकडच्या काही वर्षांत महाराष्ट्राने आधीच पाणीटंचाई आणि भीषण पूर अनुभवला आहे. भविष्यात नैसर्गिक संकटे अधिक प्रमाणात येऊ शकतात, असे आयपीसीसीच्या अहवालात सांगण्यात आले आहे.
महाराष्ट्राला लांबलचक समुद्रकिनारा आहे आणि समुद्राच्या पातळीत वाढ झाल्याने किनारपट्टीवरील जीवसृष्टी आणि पायाभूत सुविधांना धोका निर्माण होऊ शकतो. या शतकाच्या अखेरीस समुद्राची पातळी १.१ मीटरपर्यंत वाढू शकते, ज्यामुळे किनारपट्टीवर पूर
आणि धूप वाढू शकते, असा धोकाही वर्तवण्यात आला आहे. तापमानवाढ १.५ अंश सेल्सिअसपर्यंत मर्यादित ठेवणे सैद्धांतिकदृष्ट्या शक्य आहे, परंतु सध्याचे प्रमाण, व्याप्ती आणि २०३० अंतर्गत प्रतिज्ञा केलेल्या जागतिक कारवाईची गती पुरेशी नाही. आम्ही मार्गावर नाही, हे स्पष्ट आहे, असे एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील ऊर्जा अर्थशास्त्र कार्यक्रमातील आणि आयपीसीसी अहवालाच्या लेखकांपैकी आणखी एक लेखक प्रोफेसर जॉय श्री रॉय म्हणाल्या.