ठाकरे-जयसिंघानिया यांचा फोटो व्हायरल | पुढारी

ठाकरे-जयसिंघानिया यांचा फोटो व्हायरल

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांच्या फसवणूक प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. अमृता फडणवीस यांना फसविण्याचा प्रयत्न करणारी अनिक्षा जयसिंघानिया हिचे वडील, बुकी किंग अनिल जयसिंघानिया याचा शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतचा फोटो समोर आला. त्यामुळे येत्या काळात हे प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

अमृता फडणवीस यांना फसविण्याचा तसेच ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न झाला. बुकी किंग अनिल जयसिंघानिया याची मुलगी अनिक्षा हिचा अमृता यांना गोवण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भात स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सविस्तर निवेदन केले. कुटुंबाला गोवण्याचा आणि राजकारणातून उठविण्याचे डाव आखले जात होते, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर संशयाची सुई महाविकास आघाडी सरकारकडे वळली. मविआच्या काळात अनिक्षाचे वडील अनिल सिंघानियाच्या सुटकेची सर्व तयारी झाली होती, असे अनिक्षाने सांगितले होते. परंतु, राज्यात सत्तांतर झाले आणि तिच्या वडिलावरील केसेस कायम राहिल्या. मात्र, मला त्याबाबत कुणावरही आरोप करायचे नाहीत, असेही फडणवीस म्हणाले होते. मात्र, त्यांच्या सभागृहातील निवेदनाच्या दुसर्‍याच दिवशी बुकीकिंग अनिल सिंघानिया हा उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवबंधन बांधून घेत असल्याचे फोटो व्हायरल करण्यात आले. त्यात ठाकरेंसोबत असलेल्या जयसिंघानिया याच्या गळ्यात शिवसेनेचे भगवे उपरणे घातलेले दिसत आहे.

Back to top button