विधान भवनातून : जाने कहाँ गये वो दिन! राजकारणाचे रूपच बदलले!! | पुढारी

विधान भवनातून : जाने कहाँ गये वो दिन! राजकारणाचे रूपच बदलले!!

गेल्या सरकारच्या काळात आपल्याला तुरुंगात टाकण्याचा डाव रचला गेल्याचा गंभीर दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. मात्र, त्याचा तपशील आपण योग्यवेळी जाहीर करू, असेही ते म्हणाले होते. गुरुवारी सभागृहात त्यांनी खळबळजनक प्रकार कथन केला आणि मग त्याचीच चर्चा विधानभवनाच्या आवारात रंगली होती. एका फॅशन डिझायनरने आपल्या पत्नीला खोटे सांगून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला, इतकेच नव्हे; तर आपल्या शासकीय बंगल्यावरही काही व्हिडीओ काढले आणि आपल्याला लाच देण्यासाठी आणि पकडण्यासाठी सापळा रचला होता, असे त्यांनी सभागृहात सांगितले. आपल्याला राजकीय जीवनातून संपवण्याच्या या कारस्थानात काही मोठे राजकीय नेते असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. त्यांनी सभागृहात जे कथन केले त्यामुळे आमदार अवाक्च झाले! राजकारण कुठल्या थराला गेले आहे, हे फडणवीस यांच्या या कथनावरून दिसते. कालच राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्याविरोधात कटकारस्थान रचले गेले असून, आपले कुटुंबच धोक्यात आहे, अशी तक्रार सभागृहात केली होती. पूर्वी राजकीय विरोधक असले, तरी एकमेकांशी मैत्री जपण्याची परंपरा होती. वैयक्तिक हल्ले, कुटुंबावर आरोप शक्यतो टाळले जात असत. गेल्या काही वर्षांपासून राजकारण बदलले असून, प्रतिस्पर्ध्याला वैयक्तिक आणि राजकीय जीवनातून संपविण्यासाठी काहीही करण्याची प्रवृत्ती बळावली आहे. गुरुवारी जुन्याजाणत्या नेत्यांशी गप्पा मारताना हाच सूर दिसून आला.

राजकारण असे बेसूर होत असताना काल रात्री विधानभवनाच्या प्रांगणात स्वर्गीय मुकेश यांच्या गाण्यांचा सुंदर कार्यक्रम झाला. सभागृहात अर्थसंकल्पावर विभागनिहाय चर्चा सुरू असताना बाहेर प्रांगणात मात्र फिल्मी गाण्यांचा रंगारंग कार्यक्रम सुरू होता. स्व. मुकेश यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. मुकेश यांचे पुत्र नितीन मुकेश यांनी हा कार्यक्रम सादर केला. अध्यक्ष नार्वेकर यांनी दोन्ही सभागृहांतील आमदारांसाठी या संगीत मेजवानीसह स्नेहभोजनही ठेवले. नार्वेकर हे अत्यंत रसिक गृहस्थ आहेत. विधानसभा अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी विधानभवनातील त्यांच्या दालनात जी सजावट केली आहे, ती पाहून तर त्यांच्यातला कलासक्त रसिक दिसतो. गेल्याच आठवड्यात जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने त्यांनी महिला आमदारांना स्नेहभोजनासाठी आमंत्रित केले. हे भोजन थेट चांदीच्या ताटात दिले. नार्वेकरांचा नाद नाय करायचा! मुकेश यांच्या शताब्दीनिमित्ताने भव्य कार्यक्रम आयोजित केला आणि आमदारांना गाण्यांची मेजवानी दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यासह अनेक आमदार व अनेक वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते.

राज्यात इतके प्रश्न असताना असा कार्यक्रम विधानभवनाच्या प्रांगणात करणे संयुक्तिक आहे काय? असले अरसिक प्रश्न काही शंकासूर आमदारांनी विचारले; पण त्यांची उत्तरे देण्याची आवश्यकता नाही.

विधानभवन कर्मचार्‍यांचे प्रचंड हाल!

गेले दोन दिवस विधानसभेचे कामकाज रात्री खूप उशिरापर्यंत चालत आहे. पुन्हा सकाळी साडेनऊ वाजता विधानसभेची विशेष बैठक होते. आमदारांना विधानभवन परिसरातच राहायचे असते. मात्र, विधानभवनातील कर्मचारी कल्याण-डोंबिवलीपासून वसई-विरारला राहतात. त्यांचा विचार ना सरकार करते, ना आमदार! संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कर्मचार्‍यांची ही समस्या लक्षात घेऊन गुरुवारी लवकर सभागृह संपवावे, अशी विनंती केली; मात्र सुनील केदार यांचा पापड लगेच मोडला! हे सभागृह आमदारांसाठी चालते की कर्मचार्‍यांसाठी? असा सवाल करीत त्यांनी संताप व्यक्त केला. वास्तविक, विधानभवनातील कर्मचार्‍यांचे हाल आमदारांनी लक्षात घ्यायला हवेत. केदार विदर्भातील आहेत. त्यांना मुंबईकरांचे हाल काय असतात याची कल्पना नसेल. मात्र, माणुसकीच्या भावनेने सर्वच आमदारांनी कर्मचार्‍यांचाही विचार करायला हवा!

                                                                                            -उदय तानपाठक

Back to top button