भारतातील रिअल इस्टेटमधील रेकॉर्ड ब्रेक डील मुंबईत | पुढारी

भारतातील रिअल इस्टेटमधील रेकॉर्ड ब्रेक डील मुंबईत

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : दक्षिण मुंबईच्या वाळकेश्वर भागातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीतील ट्रिपलेक्स चक्क 252 कोटी रुपयांना विकले गेले आहे. सुमारे 18 हजार स्क्वेअर फूट जागेवर त्याचे बांधकाम करण्यात येणार असून, प्रति स्क्वेअर फूटमागे ऐतिहासिक 1 लाख 40 हजार रुपयांचा दर मिळाला आहे. उद्योजक नीरज बजाज आणि मायक्रोटेक डेव्हलपर्स (लोढा ग्रुप) यांच्यामध्ये ही भारतातील रिअल इस्टेटमधील रेकॉर्डब्रेक डील झाली आहे. नीरज बजाज हे बजाज ग्रुपचे प्रमोटर व डायरेक्टर आणि बजाज ऑटोचे चेअरमन आहेत.

फेब्रुवारी महिन्यात अशीच एक महागडी डील वरळीत झाली होती. सुमारे 30 हजार स्क्वेअर फूटवर असलेले पेंटहाऊस तब्बल 240 कोटी रुपयांना विकले गेले होते. उद्योजक आणि वेलस्पून ग्रुपचे चेअरमन बी. के. गोयंका यांनी हे पेंटहाऊस खरेदी केले होते. तेव्हा ही भारताच्या रिअल इस्टेटमधील सर्वात मोठी डील होती. परंतु, आता बजाज-लोढा डीलने या डीलला मागे टाकले आहे.

गेल्या महिन्यात झालेली डील ही बांधकाम पूर्ण झालेल्या इमारतीमधील होती. परंतु, बजाज-लोढा यांच्यात झालेली डील ही निर्माणाधीन आणि नुकतेच बांधकाम सुरू झालेल्या इमारतीमधील आहे. 31 मजली या टॉवरचे बांधकाम नुकतेच सुरू झाले आहे. बिम्ससाठी जमीन खणली जात आहे. जून 2026 मध्ये या इमारतीचे बांधकाम पूर्ण होणार आहे. नीरज बजाज यांनी 29, 30 आणि 31 मजले बूक केले आहेत. यासह त्यांनी 8 कार पार्किंग बुक केले आहेत.

Back to top button