Mumbai Crime | लालबागमध्ये कपाटात प्लॅस्टिक पिशवीत आढळला महिलेचा मृतदेह, हात, पाय कापलेल्या अवस्थेत | पुढारी

Mumbai Crime | लालबागमध्ये कपाटात प्लॅस्टिक पिशवीत आढळला महिलेचा मृतदेह, हात, पाय कापलेल्या अवस्थेत

Mumbai Crime : मुंबईतील लालबाग परिसरातील पेरु कंपाउंडमध्ये एका निर्घृण खुनाची घटना समोर आली आहे. या ठिकाणी एका ५२ वर्षीय महिलेचा मृतदेह प्लॅस्टिक पिशवीत आढळून आला आहे. हा मृतदेह स़डलेल्या अवस्थेत होता आणि तो प्लॅस्टिक पिशवीत बांधून एका कपाटात ठेवला होता. या घटनेने लालबाग परिसरात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, या मृतदेहाची ओळख पटली असून तिचे नाव वीणा प्रकाश जैन असे आहे. धक्कादायक म्हणजे तिचे हात आणि पाय कापण्यात आले आहेत. या प्रकरणी सदर महिलेच्या मुलीची चौकशी सुरू आहे. या प्रकरणी काळाचौकी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल झाल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

अधिक मिळालेल्या माहितीनुसार, महिलेचा मृतदेह तिच्या घरातील कपाटात सापडला आहे. तिच्या मुलीनेच ही कृत्य केले असण्याची पोलिसांना शंका आहे. दरम्यान, मृत महिलेच्या २२ वर्षीय मुलीला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तिची चौकशी केली जात आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरु असल्याची माहिती डीसीपी प्रवीण मुंढे यांनी दिली आहे. चाळी प्रकारच्या इमारतीत पहिल्या मजल्यावर एका घरामध्ये मृतदेह सापडला आहे. सदर महिला बेपत्ता असल्याची तक्रार आली होती. त्यानुसार त्या महिलेच्या घराची झडती घेतली असता मृतदेह आढळून आला. या प्रकरणी अधिक तपास सुरु असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, महिलेच्या खुनामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. (Mumbai Crime)

 हे ही वाचा :

Back to top button