वारकरी आणि स्थानिकांना विश्वासात घेऊनच पंढरपूर कॉरिडोरचा विकास : उदय सामंत | पुढारी

वारकरी आणि स्थानिकांना विश्वासात घेऊनच पंढरपूर कॉरिडोरचा विकास : उदय सामंत

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  वारकर्‍यांसह स्थानिक व्यापारी आणि संबंधित घटकांना विश्वासात घेऊनच पंढरपूर कॉरिडोरचा आराखडा तयार केला जाईल. कोणालाही न दुखावता तसेच पंढरपुरातील पुरातन वास्तूंना धक्का न लावता हा कॉरिडोर तयार करण्याची सरकारची भूमिका असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी सोमवारी विधान परिषदेत स्पष्ट केले.

पंढरपूर कॉरिडोर विषयावर शिवसेना ठाकरे गटाच्या आमदार मनीषा कायंदे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. यावेळी झालेल्या चर्चेला मंत्री सामंत यांनी उत्तर दिले. पंढरपूर या तीर्थस्थळाचा विकास करण्याची घोषणा ऑक्टोबर 2022 मध्ये पर्यटनमंत्र्यांनी केली होती. या विकास आराखड्यात जुनी मंदिरे, मठ आणि ऐतिहासिक वास्तू नष्ट होण्याची भीती असल्याने या कॉरिडोरला मोठ्या प्रमाणावर विरोध करण्यात आला.

यावर उत्तर देताना मंत्री सामंत म्हणाले की, पंढरपूर तीर्थक्षेत्राचा विकास करताना सगळ्यांना विश्वासात घेतले जाईल. शहरातील गल्ल्या, रस्ते, घाट, चंद्रभागा नदीकाठाचा विकास, विठ्ठल मंदिर ते पालखी मार्ग याकडे कॉरिडोर तयार करताना खास लक्ष दिले जाणार आहे.

Back to top button