विधान भवनातून : मंत्रिपदांना आसुसलेले आता पाससाठीही तरसतात! | पुढारी

विधान भवनातून : मंत्रिपदांना आसुसलेले आता पाससाठीही तरसतात!

नागालँडमध्ये राष्ट्रवादीने भाजप सामील असलेल्या सरकारला पाठिंबा दिल्यानंतर महाराष्ट्रात उडालेली खळबळ अजून पूर्णपणे शमलेली नाही. विधानसभेत आणि बाहेरही त्यावरून टोमणेबाजी सुरूच असते. परवा तर अजित पवार अशाच टोमण्यामुळे चांगलेच संतापले होते. शरद पवारांच्या या निर्णयाने त्या पक्षाच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांची अडचण होते. काय उत्तर द्यावे, हे त्यांना समजत नाही. याच पार्श्वभूमीवर आज आणखी एक घटना घडली.

विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची नियुक्ती करण्यात आल्याची धक्कादायक माहिती माजी मंत्री जयंत पाटील यांनी आज विधान परिषदेत दिली. वास्तविक पक्षाचे विधान परिषदेतील गटनेते आणि प्रतोद ही पदे रिक्त आहेत. मात्र, विधिमंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर गटनेतेपदी एकनाथ शिंदे असल्याचे दिसत आहे, असे जयंत पाटील यांनी पॉईंट ऑफ प्रोसिजरच्या मुद्द्यावर सभागृहात सांगितले.

राष्ट्रवादीच्या विधान परिषदेतील गटनेतेपदी राष्ट्रवादीने एकनाथ खडसे यांची नेमणूक केल्याचे पत्र विधिमंडळ सचिवालयाला दिल्याचे पाटील यांनी सांगितले. एकनाथ शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्रीच बदलले असून, आता आमच्या पक्षाच्या विधान परिषदेतील गटनेतेपदही तेच घेतात की काय, असा प्रश्न निर्माण झाला असून, आता माझे पक्षाचे गटनेता हे पददेखील धोक्यात येईल की काय, अशी भीती वाटत असल्याची मिश्कील टिप्पणी जयंत पाटील यांनी केली. नागालँडच्या मुख्यमंत्र्यांना सर्वच पक्षांच्या आमदारांनी पाठिंबा दिला आहे. आता आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्रात नवा पायंडा पाडत आहेत काय, असा टोमणा पाटील यांनी मारला आणि सभागृहात हशा पिकला.

शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे यांची एक कथित आक्षेपार्ह व्हिडीओ क्लिप व्हायरल झाल्याची चर्चा आज विधान भवन परिसरात सुरू होती. ही क्लिप तोडमोड करून व्हायरल केल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला असला आणि यासंदर्भात आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीयांसह आणखी काही जणांना अटक केली गेली असली, तरी या निमित्ताने सोशल मीडियाकडून होत असलेल्या आक्रमणाबद्दलही अनेक आमदार स्वतःचे अनुभव एकमेकांना सांगत होते. विधिमंडळच्या पायर्‍यांवरही याचीच चर्चा रंगली होती. सार्वजनिक ठिकाणी वागताना आता खूप काळजी घ्यावी लागते, कोण कधी सोबत फोटो काढून व्हायरल करील सांगता येत नाही. त्यामुळे मीडिया आणि सोशल मीडिया या दोघांसमोर सावध राहायला हवे, असे काही आमदार सांगत होते.

विधान भवनात आजपासून सर्वसामान्यांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या कामाच्या पद्धतीप्रमाणे भेटायला येणार्‍यांची संख्या प्रचंड वाढली. विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असतानाही मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात, बाहेर, इतर मंत्र्यांच्या दालनात हजारो लोक येत होते. यांना कोण पासेस देतो, हे कोडेच आहे. विधान भवनात तर प्रचंड रेटारेटी करूनच वावरावे लागते. त्यामुळे आजपासून सर्वसामान्यांना पासेस देणे बंद करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्षांंनी दिले आहेत. आज अचानक ही प्रवेशबंदी केल्याने अनेकांची अडचण झाली. आमदारांनी शिष्टमंडळे आणली होती. त्यांना विधान भवनात प्रवेश नसल्याने गेटबाहेर मोठी गर्दी झाली होती. एक आमदार तर मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांकडे पासेससाठी विनवणी करीत होता. मंत्री करत नाहीत, महामंडळेही देत नाहीत, आता निदान पास तरी द्या, असा शेरा या आमदाराने मारताच उपस्थितांमध्ये खसखस पिकली. शिवाय तिथे असलेल्या अन्य आमदारांनी या व्यथेस दुजोरा दिला!
-उदय तानपाठक

Back to top button