शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडीओ प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी : मंत्री शंभूराज देसाई | पुढारी

शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडीओ प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी : मंत्री शंभूराज देसाई

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्याशी संबंधित समाज माध्यमावर व्हायरल होत असलेल्या वादग्रस्त व्हिडिओ प्रकरणाचे पडसाद सोमवारी विधानसभेत उमटले. या प्रकरणी एसआयटी नेमून वरिष्ठ आयपीएस अधिकार्‍यामार्फत चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत केली.

व्हिडिओ एडिट करून व्हायरल केल्या प्रकरणी ठाकरे गटाच्या विनायक डावरेसह चार जणांना अटक करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रकरणाची सखोल चौकशी करून सूत्रधारालाही शोधून काढण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

11 मार्च रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत शीतल म्हात्रे सहभागी झाल्या होत्या. या रॅलीतील व्हिडीओ सध्या समाज माध्यमात व्हायरल होत आहे. या वादग्रस्त व्हिडीओचे पडसाद सोमवारी विधानसभेत उमटले. या व्हिडीओ प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी सत्ताधारी पक्षातील आमदारांनी लावून धरली.

शिवसेनेच्या सदस्या यामिनी जाधव यांनी हा प्रश्न उपस्थित करीत चौकशीची मागणी केली. जाधव यांच्या या मागणीला भाजपच्या मनीषा चौधरी यांनी पाठिंबा दर्शवित या महिलेचा संसार उद्ध्वस्त होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली. राज्यात काही दिवसांपूर्वी महिला दिन साजरा करण्यात आला. त्यानंतर अशा प्रकारची घटना समोर येणे हे निंदनीय असल्याचे त्यांनी सांगितले. हा व्हिडीओ कोणी मॉर्फ केला हे शोधून काढून त्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. त्यांच्या या मागणीनंतर सत्ताधारी पक्षातील जवळपास सर्वच पक्षाच्या आमदारांनी सभागृहात घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी 10 मिनिटांसाठी सभागृहाचे काम स्थगित केले.

कामकाज सुरू झाले तेव्हा भारती लव्हेकर यांच्यासह इतर अनेक आमदारांनी या प्रश्नी कारवाई करण्याची मागणी केली. लव्हेकर यांनी संबंधितांचे मोबाईल जप्त करून कोणाचा यात सहभाग आहे, हे शोधण्याची मागणी केली. तर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही अशाप्रकारे व्हिडीओ मॉर्फ केला असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली. यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राज्य सरकारला निवेदन करण्याचे आदेश दिले होते. त्यावर शंभूराज देसाई यांनी निवेदन करताना एसआयटी चौकशीची घोषणा केली.

Back to top button