मुंबईत पुढची २५ वर्षे ठाकरेंचीच सत्ता : आदित्य ठाकरे | पुढारी

मुंबईत पुढची २५ वर्षे ठाकरेंचीच सत्ता : आदित्य ठाकरे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  मुंबईत आतापर्यंत २५ वर्षे शिवसेनेची सत्ता होती. पुढची २५ वर्षेही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच सत्ता येणार म्हणजे येणार, असा दावा शिवसेना (ठाकरे गट नेते, आ. आदित्य ठाकरे यांनी रविवारी केला.

शिवगर्जना अभियान अंतर्गत आज गोरेगाव पुर्वेत शिवसेना ठाकरे गटाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ नेते सुभाष देसाई, आ. रवींद्र वायकर, आ. सुनिल प्रभू, खा. प्रियंका चतुर्वेदी आदी नेते व्यासपीठावर उपस्थित होते. आदित्य ठाकरे यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिंदे गट आणि भाजपावर जोरदार टिकास्त्र सोडले. शिवसेनेने मुंबईसाठी अनेक गोष्टी केल्या. या केलेल्या कामांमुळेच ‘करून दाखवले’ असे अभियान आपण चालवले. मुंबईची तुलना जगातील कोणत्याही शहरासोबत होऊ शकत नाही. मुंबई वेगळी आहे.

मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आल्यापासून विकासासाठी शिवसेनेने आणि उद्धव ठाकरेंनी मेहनत घेतली. नियोजनबद्ध काम करत विकास केला. मुंबईकरांसाठी ९० हजार कोटींच्या ठेवी तयार केल्या. आज राज्यातले घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणतात की या ठेवी कुणासाठी आहेत, कशासाठी • आहेत. या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी अभ्यास केला असता तर त्यांनी असा प्रश्न केला नसता. त्यांना कदाचित वाटत असेल की हे पैसेदेखील खर्च करू, अजून आमदार विकत घेऊ. पण, हा पैसा मुंबईचा आणि मुंबईकरांचा आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला. पालिकेच्या ठेवी या विकासकामांसाठी आहेत. त्यातून कोस्टल रोड बनविण्याचा निर्णय झाला. आता या सरकारने त्या निर्णयात बदल केला आहे. दक्षिण मुंबई ते वरळीपर्यंतचा कोस्टल रोड मुंबई पालिका बांधणार आहे. ज्यावर एकही टोल नसणार आहे. तर तिथून पुढे उपनगरापर्यंत पोहचणारा कोस्टल रोड मुख्यमंत्र्यांच्या ताब्यातील एमएसआरडीसी बांधणार आहे. त्यावर चार-चार टोल असणार आहेत, असेही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले..

शिंदे – फडणवीस सरकारने मुंबईतील रस्ते काँक्रीटीकरणाचे काम म्हणजे भ्रष्टाचार आहे. राज्यातील सरकार हे सर्वसामान्यांचे नसून फक्त बिल्डर आणि कंत्राटदारांचे सरकार आहे. रस्ते काँक्रीटीकरणात नियम बदलून कंत्राटदारांना तब्बल ६० टक्के फायदा पोहचविण्यात आला. काम सुरू झालेले नसताना ६०० कोटी रूपये आगाऊ देण्यात आले. आमची सत्ता आल्यानंतर या काँक्रीटीकरणाची चौकशी करू, अधिकय़ांची चौकशी करू आणि जे जे यात दोषी असतील त्यांना जेलमध्ये पाठवू, असा उशाराही आदित्य ठाकरे यांनी दिला.

Back to top button