धारावीच्या सिमरनचे पाऊल डब्ल्यूपीएलच्या पीचवर

धारावीच्या सिमरनचे पाऊल डब्ल्यूपीएलच्या पीचवर
Published on
Updated on

धारावी; अरविंद कटके : आजच्या स्पर्धात्मक युगात आर्थिक पाठबळ नसताना महिला प्रीमिअर लीग (डब्लूपीएल) सारख्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी निवड होणे फार कठीण असले तरी ते अशक्य नाही, हे धारावी झोपडपट्टीत राहणाऱ्या सिमरनबानो जाहिदअली शेख नावाच्या २१ वर्षीय तरुणीने दाखवून दिले. राष्ट्रीय पातळीवरील महिला प्रीमिअर लीग (डब्ल्यूपीएल) स्पर्धेसाठी यूपी वॉरियर संघात तिची निवड झाली आहे. वयाच्या ८ व्या वर्षांपासून धारावी आझाद नगरच्या गल्लीबोळातील लहान मुलांसह क्रिकेटचे धडे गिरविणाऱ्या सिमरनने बालवयातच राष्ट्रीय पातळीवर क्रिकेट खेळण्याचे स्वप्न पाहिले होते. आज तिचे स्वप्न सत्यात उतरले आहे.

धारावी जस्मिन मिल रोडवरील आझाद नगर झोपडपट्टीत राहणाऱ्या एका वायरमनच्या मुलीचा शून्यातून शिखरापर्यंतचा प्रवास अनोखा आहे. सिमरनचा जन्म १२ जानेवारी २००२ साली धारावीतील एका गरीब कुटुंबात झाला. सात भावंडांमध्ये ती तिसरी असून संपूर्ण कुटुंबाचा भार तिच्या एकट्या वडिलांवर होता. हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे वडिलांनी तिला माहीमच्या मनपा शाळेत घातले. पण लहानपणापासून सिमरनचे खेळण्याकडे लक्ष असल्याने तिचे अभ्यासात मन लागत नव्हते, शाळेतून परतल्यावर आपल्या भावंडांसह मैदानी खेळात ती इतकी रमली की गोट्या, भवरे, क्रिकेटसारख्या खेळात परिसरात तिने आपला दबदबा निर्माण केला. घरचे काम सोडून सतत मुलांमध्ये खेळत असल्याने तिला आईचा ओरडा ऐकावा लागत होता.

शेजारच्या मुलांमध्ये खेळत असताना क्रिकेटमध्ये तिला आवड निर्माण झाली. तिची फलंदाजी, क्षेत्ररक्षण पाहून आझाद नगरमधील क्रिकेट टीमने वयाच्या १३ व्या वर्षी तिला आपल्या संघात घेतले. एका टेनिस बॉल क्रिकेट टूर्नामेंटमध्ये आपल्या उत्कृष्ट फलंदाजी व क्षेत्ररक्षणाच्या जोरावर स्पर्धांमध्ये मॅन ऑफ दि मॅच, मॅन ऑफ दि सीरिजसारखी अनेक पारितोषिके तिने पटकाविली. नंतर विभागातील लहान सहान क्रिकेट स्पर्धा तिने गाजवल्या. सिमरनची कामगिरी पाहून जुबेर शेख नावाच्या तरुणाने वयाच्या १५ व्या वर्षी सिमरनला प्रशिक्षणासाठी क्रॉस मैदानमधील रुमडे अकादमीमध्ये पाठवले.

प्रशिक्षण सुरू असताना युनाइटेड क्लबमध्ये खेळताना तिने मैदान गाजवले. दररोजच्या प्रॅक्टिसमुळे तिला दहावीतच शाळा सोडावी लागली. नंतर तिने शिवाजी पार्कातील चाचणी शिबिरात भाग घेऊन आपल्या उत्कृष्ट फलंदाजीने मैदान गाजविल्याने अंडर-१९ साठी तिची निवड झाली. मुंबईच्या अंडर १९ संघातील चांगल्या कामगिरीच्या आधारे तिची मुंबईच्या वरिष्ठ संघात निवड झाली. नंतर ती आंतर- क्षेत्रीय टी-२० स्पर्धेत पश्चिम विभागीय संघाकडून तसेच प्रेसिडेंट कप टी-२० महिला लीगमध्ये मुंबई थन्डर्सकडून खेळली. मुंबई वॉरियर्स विरुद्धच्या सामन्यात तिने ५४ चेंडूत ७४ धावा केल्या. २०२२-२३ महिला टी-२० चॅलेंजर ट्रॉफीमध्ये इंडिया सी कडून खेळताना राजस्थान विरुद्धच्या सामन्यात ८६ चेंडूत ९७ धावा केल्या.

  • सिमरन उत्कृष्ट फलंदाज, शिवाय अतिशय चपळ क्षेत्ररक्षण आणि अचूक थ्रोसाठी ओळखली जाते. त्यामुळे महिला प्रीमियर लीग (डब्लूपीएल) २०२३ च्या लिलावात तिचा यूपी वॉरियर्ससाठी १० लाख रुपयांत लिलाव करण्यात आला.
  •  सिमरन अजूनही धारावीतच राहते. महिला प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) हा तिच्या करियरमधील टर्निंग पॉईंट आहे. या पॉईंटवरून ती आपल्या पालकांचे स्वप्न पूर्ण करू शकते. इतका आत्मविश्वास सिमरनमध्ये नक्कीच आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news