माळवाडी गाव विकणे आहे; कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी केला ठराव | पुढारी

माळवाडी गाव विकणे आहे; कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी केला ठराव

नवी मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  नाशिक जिल्ह्यातील देवळा येथील माळवाडी येथील शेतकर्‍यांनी काल सोमवारी एकत्र येऊन माळवाडी गाव विक्रीचा ठराव केला. कांद्याला पुरेसा दर मिळत नाही. शेत मालाला विशेष म्हणजे गावातील 95% शेतकरी कांदा उत्पादक आहेत. कुठल्याही शेती मालाला भाव नाहीत, म्हणून उदरनिर्वाहासाठी आत्महत्या करण्यापेक्षा जमिनी विकून जगता यावे, म्हणून आम्ही सर्व ग्रामस्थांनी गाव विकण्याचा एकमताने ठराव करीत आहोत. यात केंद्र राज्य शासनाने आमच्या जमिनी घेऊन आम्हाला पैसे उपलब्ध करून द्यावेत, असा ठराव एकमताने केल्याची माहिती येथील सुशिक्षित बेरोजगार शेतकरी प्रवीण बागुल, माळवाडी (ता. देवळा, जि. नाशिक) यांनी ‘पुढारी’शी बोलताना दिली. हे शेतकरी ग्रामस्थ मिळून शेती व्यवसायातून मोबदला मिळत नसल्याने गाव विक्रीचा ठराव करण्याची ही दुदैर्वाने ही वेळ आल्याचे म्हणाले.

शेतकर्‍याने केली कांद्याची होळी

नगरसूल; पुढारी वृत्तसेवा :  कांद्याला मिळणारा मातीमोल भाव आणि शासनाची निष्क्रियता याचा निषेध करण्यासाठी मातुलठाण येथील शेतकर्‍याने चक्क कांद्याची होळी करीत होळी साजरी केली. या होळीसाठी मुख्यमंत्री यांनी उपस्थित राहण्याचे आमंत्रण या शेतकर्‍याने स्वत:च्या रक्ताने पत्र लिहून दिले होते. मात्र, मुख्यमंत्री उपस्थित न राहिल्याने त्याने स्वत:च कांद्याची होळी पेटविली. येवला तालुक्यातील नगरसूल येथील तरुण शेतकरी कृष्णा भगवान डोंगरे यांनी त्यांच्या सव्वा एकरातील कांद्याला अग्निडाग दिला. यावेळी लोकप्रतिनिधींच्या नावाने बोंबा मारून निषेध व्यक्त करण्यात आला. कांद्याची होळी करताना उपस्थित महिला शेतकर्‍यांनी सरकारच्या नावाने बोंबा मारत निषेध व्यक्त केला.

Back to top button