काही लोकांचा वर्षभर शिमगा : उपमुख्यमंत्री फडणवीस | पुढारी

काही लोकांचा वर्षभर शिमगा : उपमुख्यमंत्री फडणवीस

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  काही लोक 365 दिवस शिमगा करत असतात. मला त्यांना सांगायचे आहे की एखादा दिवस ठीक आहे; पण उरलेले 364 दिवस आपण सभ्य माणसांसारखे वागण्याचा प्रयत्न केला तर चांगले होईल. अनेक वेळा आमच्या काही मित्रांना खोटे सांगून, त्यांना भांग वगैरे पाजून दिली जाते. त्यानंतर दिवसभर त्यांचे जे काही चालले असते ते कळतच नाही, अशी जोरदार टोलेबाजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. धुळवडीनिमित्त भाजप नेते माजी राज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

बदला आहे, असे फडणवीस म्हणाले

ते म्हणाले की, मला एक-दोन लोकांना सल्ला द्यायचा आहे की उत्तर भारतामध्ये होळीच्या दिवशी शिमगा करतात. आपल्याकडेही शिमगा करण्याची पद्धत आहे; पण काही लोक 365 दिवस शिमगा करत असतात. मला त्यांना सांगायचे आहे की एखादा दिवस ठीक आहे; पण उरलेले 364 दिवस आपण सभ्य माणसांसारखे वागण्याचा प्रयत्न केला तर चांगले होईल, असा टोला फडणवीस यांनी खासदार संजय राऊत यांना नाव न घेता लगावला. अनेक वेळा आमच्या काही मित्रांना खोटे सांगून, त्यांना भांग वगैरे पाजून दिली जाते. त्यानंतर दिवसभर त्यांचे जे काही चालले असते ते कळतच नाही. कुणी गाणे म्हणत होते. कुणी रडत होते. हे सगळे पाहून मजा आली; पण अशी नशा करण्यापेक्षा भक्तीची, संगीताची आणि कामाची नशा करा, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना सुनावले.

अर्थसंकल्पात सर्वांचे रंग दिसतील

गुरुवारी सादर होणार्‍या अर्थसंकल्पात प्रत्येकाचे रंग पाहायला मिळतील. यात सर्व घटकांचा विचार करून मांडला जाईल. त्यामुळे आपण एक सर्वसमावेशक अर्थसंकल्प सादर करू, असे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. ज्याप्रकारे वेगवेगळ्या रंगांनी होळी साजरी केली जाते, त्याचप्रकारे अर्थसंकल्पही वेगवेगळ्या रंगांमध्ये रंगलेला असेल. सगळ्यांना त्यांचे रंग त्यात पाहायला मिळतील. सर्वसमावेशक अर्थसंकल्प सादर करू.

दिलासादायक अर्थसंकल्पाचे संकेत

फडणवीस हे राज्याचे वित्तमंत्री म्हणून आपला पहिला अर्थसंकल्प गुरुवारी सादर करणार आहेत. त्यामुळे त्यांच्या अर्थसंकल्पाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यांनी हा अर्थसंकल्प सर्वच घटकांना दिलासा देणारा ठरणार आहे, असे संकेत दिले.

Back to top button