मुंबईत दाराजवळ चप्पल ठेवण्यावरून वाद; शेजाऱ्याची हत्या | पुढारी

मुंबईत दाराजवळ चप्पल ठेवण्यावरून वाद; शेजाऱ्याची हत्या

मिरा रोड; पुढारी वृत्तसेवा :  मिरारोड मधील नयानगर भागात एका इमारतीत चप्पल ठेवण्यावरून शेजाऱ्याबरोबर भांडण झाले. झालेल्या भांडणात शेजाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये नयानगर पोलीस ठाण्यात पती, पत्नी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेला अटक करण्यात आले असून तिचा पती फरार झाला आहे.

मिरारोड, नया नगर येथील अस्मिता डॅफोडिल अपार्टमेंटमध्ये एका किरकोळ कारणावरून भांडणात रूपांतर होऊन आयुष्य कसे उद्धस्त होते याचे उदाहरण आपल्याला पहायला मिळाले. किरकोळ भांडण व राग अनावर झाल्याने एकाचा अनमोल जीव गेला आहे. पॅसेजमध्ये चप्पल ठेवण्यावरून शेजाऱ्यामध्ये आपापसांत वाद झाला. त्या वादातून दोघांमध्ये हाणामारी झाली. त्या हाणामारीत शेजाऱ्याचा मृत्यू झाला आहे. मृताच्या पत्नीच्या म्हणण्यानुसार, पॅसेजमध्ये चप्पल ठेवण्यावरून वाद झाला, त्याचे नंतर हाणामारीत रूपांतर झाले. भांडणानंतर शेजारी अफसर खत्री घरात येऊन झोपले असता त्यांच्या तोंडातून फेस येत होता. त्याना जवळच्या हैदरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, हैदरी चौक येथे नेण्यात आले, तिथे डॉक्टरांनी त्याला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

नयानगर पोलिस ठाण्याचे पोलीस अधिकारी जिलानी सय्यद यांनी सांगितले की, दाम्पत्य आणि पीडितेचे एकमेकांच्या दाराजवळ चप्पल ठेवण्याच्या कारणावरून अनेकदा भांडण झाले आणि अशाच एका वादातून शनिवारी रात्री हाणामारी झाली. अफसर खत्री या भांडणात जखमी झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झैनब रुपानी या महिलेला मीरा रोड पूर्व नया नगर येथून अटक करण्यात आली आहे, तर तिचा पती समीर रुपानी हा शेजाऱ्याच्या हत्येप्रकरणी फरार आहे. याप्रकरणी समीर रुपाणी आणि त्यांच्या पत्नीविरुद्ध नयानगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

Back to top button