HSC Paper Leak: बारावी पेपरफुटी प्रकरणी ३ विद्यार्थ्यांसह चौघांवर गुन्‍हा दाखल | पुढारी

HSC Paper Leak: बारावी पेपरफुटी प्रकरणी ३ विद्यार्थ्यांसह चौघांवर गुन्‍हा दाखल

पुढारी ऑनलाईन : बारावीच्या गणिताची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी तीन विद्यार्थ्यांसह चार जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी दादरच्या डॉ.अँटोनियो डिसिल्वा हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमधील एका विद्यार्थ्याच्या मोबाईल फोनमधून प्रश्नपत्रिकेचा काही भाग जप्त करण्यात आला आहे. हे प्रकरण गुन्हे शाखेकडे सुपूर्द करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

बारावी पेपर फुटी प्रकरणात नवीन माहिती समोर येत आहे. सर्वप्रथम बुलढाण्यात दहा वाजता पेपर सुरू होताच काही मिनिटात गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील काही पाने येथील एका परीक्षा केंद्रावरून व्हायरल झाली होती. त्यानंतर पुन्हा मुंबई येथे परीक्षार्थीच्या मोबाईलमध्ये दहा वाजून १७ मिनिटांनी गणिताचा पेपर सापडल्याने. याप्रकरणाचे मुंबई कनेक्शन समोर येत आहे. त्यामुळे या पेपरफुटीचे कनेक्शन आणखी कुठे आहे का? याचा पोलिस तपास करत आहेत.

पेपर फुटीसाठी (Paper Leak) व्हॉट्स ॲपचा (Whatsapp) वापर करण्यात आला. याप्रकरणात ९० हून अधिक जणांचा ग्रुप तयार करण्यात आला. त्यानंतर या ग्रुपमध्ये पेपर लीक करण्यात आला. या ग्रुपमध्ये शिक्षक, विद्यार्थी आणि इतर काही व्यक्ती देखील सहभागी असल्याची शक्यता असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. पेपर फुटीची घटना समोर येताच हा व्हॉट्स ॲप ग्रुप डिलीट करण्यात आला. याबाबत सायबर सेलकडून अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी स्‍पष्‍ट केले आहे.

हेही वाचा:

Back to top button