मुंबईजवळ शनिवारी रात्री भरसमुद्रात 'कॉर्डेलिया द एम्प्रेस' या आलिशान क्रूझवर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने छापा टाकून रेव्ह पार्टी उधळली आणि 8 जणांची धरपकड केली. या प्रकरणात बॉलीवूडचा किंग शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्यासह तिघांना अटक करण्यात आली.
या तिघांकडून 13 ग्रॅम कोकेन, 5 ग्रॅम एमडी, 21 ग्रॅम चरस, एमडीएमएच्या 22 गोळ्या आणि एक लाख 33 हजार रुपयांची रोकड असा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे समजते.
अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) या कारवाईत मुनमुन धमीचा, नूपुर सारिका, इस्मित सिंग, मोहक जस्वाल, विक्रांत छोकर, गोमित चोप्रा, अरबाज मर्चंट आणि शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान यांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली.
एनसीबीच्या अधिकार्यांनी आर्यन खानची तब्बल चार तास चौकशी केली. त्यानंतर अरबाज आणि मुनमुन धमीचा यांच्यासह आर्यन खानला पोलिसांनी अटक करून वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना जे. जे. रुग्णालयात नेले.
एनसीबीने ताब्यात घेतलेल्या अन्य दोन तरुणी आाणि तीन तरुण अशा पाच जणांची चौकशी सुरू असून काही ड्रग्ज विक्रेत्यांना ताब्यात घेऊन चौकशीसाठी एनसीबीच्या कार्यालयात नेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. अरबाज मर्चंट हा आर्यन खानचा जवळचा मित्र असल्याचे समजते.
एनडीपीए कायद्यातील कलम 27 (ए) अन्वये आर्यन, अरबाज आणि मुनमुन यांना अटक करण्यात आली आहे. नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स अॅक्ट (1985) हा अमली पदार्थांच्या विक्रीला चाप लावण्यासाठी केलेला कडक कायदा आहे. या कायद्यातील कलम 27 अनुसार अमली पदार्थांचे सेवन करणे हा दंडनीय गुन्हा ठरवण्यात आला असून, त्याबद्दल एक वर्षाची कैद किंवा 20 हजार रुपये दंड अथवा दोन्ही अशा शिक्षेची तरतूद उपकलम (ए) अंतर्गत करण्यात आली आहे.
दोन आठवड्यांच्या तपासानंतर 'कॉर्डेलिया द एम्प्रेस' या क्रूझवर छापा टाकण्यात आल्याचे एनसीबीच्या अधिकार्यांनी सांगितले. या कारवाईदरम्यान बॉलीवूडमधील अनेक व्यक्तींची नावे समोर आली आहेत. आम्ही निष्पक्ष पद्धतीने आणि कायद्याच्या कक्षेतच राहून कारवाई करत आहोत, असेही एनसीबीतर्फे सांगण्यात आले.
या क्रूझवरील कारवाईदरम्यान कोट्यवधी रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला असून त्यात प्रामुख्याने एमडी, कोकेन आणि हशीश असल्याचे समजते. एनसीबीने मागील वर्षभरात मुंबईत 300 छापे टाकले असून ही कारवाई सुरूच राहील, असे एनसीबीच्या अधिकार्यांनी सांगितले.
एनसीबीचे अधिकारी पर्यटक बनून 'कॉर्डेलिया द एम्प्रेस' जहाजावर गेले होते. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी या पथकाचे नेतृत्व केले. जहाज खोल समुद्रात गेल्यावर रेव्ह पार्टी सुरू झाली. पार्टीत अमली पदार्थांचे सेवन सुरू झाल्याचे पाहिल्यावर एनसीबीच्या पथकाने धडक कारवाई सुरू केल्याचे सांगण्यात आले.
या क्रूझची क्षमता 1 हजार 800 लोकांची असली, तरी रेव्ह पार्टीच्या वेळी 600 जण उपस्थित होते. या सर्वांना सोशल मीडियावरून निमंत्रणे पाठवण्यात आली होती. काही जणांना तर टपालाने निमंत्रणाचे किट पोहोचते झाले होते. रेव्ह पार्टीसाठी हाय प्रोफाईल मंडळींकडून 60 हजार ते पाच लाख रुपये एंट्री फी आकारण्यात आली होती, असे समजते.
शाहरुख खान सतत चर्चेत असला तरी शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान फारसा चर्चेत नसतो. तो नेहमी झगमगाटापासून दूर असतो. आर्यनचा जन्म नवी दिल्लीत 13 नोव्हेंबर 1997 रोजी झाला. शाहरुख आणि गौरी यांचे हे पहिले अपत्य. धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून शालेय शिक्षण घेतल्यानंतर आर्यन लंडनच्या सेव्हन ओक्समध्ये पुढच्या शिक्षणासाठी गेला. त्यानंतर कॅलिफोर्निया विद्यापीठात त्याने उच्च शिक्षण घेतले. त्याचबरोबर सिनेमा निर्मितीचे प्रशिक्षणही आर्यनने पूर्ण केले आहे. मार्शल आर्टमध्ये त्याने ब्लॅक बेल्ट मिळवला आहे.
सर्वसाधारणपणे सर्वच प्रसिद्ध अभिनेत्यांची मुले चित्रपटात झळकतात. पण आर्यन फारसा झळकलेला नाही. 2001 मध्ये आलेल्या 'कभी खुशी कभी गम' चित्रपटात शाहरुखच्या लहानपणाचा रोल त्याने निभावला होता. 2004 मध्ये आलेल्या 'हम लाजबाब है' या चित्रपटासाठी डायलॉग रेकॉर्डिंग केले. त्याला बेस्ट डबिंग चाईल्ड आर्टिस्टचा पुरस्कार मिळाला आहे. 'द लायन किंग'मध्ये सिम्बा या पात्रासाठी त्याने आवाज दिला होता.
* कोकेन, चरस, एमडीसह 1 लाख 33 हजार जप्त
* आर्यनसह अन्य पाचजणांची तब्बल 4 तास चौकशी
* कलम 27 नुसार अटक; 1 वर्ष कैद किंवा 20 हजार रुपये दंड किंवा दोन्ही एकत्रित अशी तरतूद
* बॉलीवूडमधील अनेक नावे समोर
* रेव्ह पार्टीला 600 जणांची उपस्थिती
* 60 हजार ते 5 लाख रुपये एन्ट्री फी